आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पार्टीचे (टीडीपी) प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू आणि त्यांचे पुत्र माजी राज्यमंत्री नारा लोकेश यांना नजर कैदेत ठेवण्यात आल्यानंतर चंद्राबाबू नायडू यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी सरकारवर निशाणा साधला.
सध्याचे सरकार मानवाधिकार आणि मूलभूत हक्कांचे उल्लंघन करत आहे. मी सरकार आणि पोलिसांनी इशारा देतो की तुम्ही अशा प्रकारचे राजकारण करु नका. अटक करुन आमच्यावर नियंत्रण आणू शकणार नाही. जेव्हा मला सोडतील, तेव्हा मी पुन्हा 'चलो आत्मकुरू' आंदोलन सुरु करणार असल्याचे चंद्राबाबू नायडू यांनी सांगितले.
दरम्यान, आंध्र प्रदेशात टीडीपीच्या नेत्याची हत्या करण्यात आली होती. या हत्येच्या निषेधार्थ आणि राज्यातील वायएसआर काँग्रेस सरकारच्या विरोधात ए. चंद्राबाबू नायडू यांनी आज सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत 'चलो आत्मकूर' आंदोलन करण्याच्या निर्णय घेतला होता. मात्र, आंदोलनापूर्वीच त्यांच्यासह टीडीपीच्या नेत्यांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवले आहे. तसेच, अनेक पार्टीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.