चंबा: हिमाचल प्रदेशातल्या चंबा जिल्ह्यात एक मोठा अपघात टळला आहे. घाटातून जात असलेली एक बस पॅरापिटला धडकली. तिथून ती खाली ओसरणार होती. मात्र काही इंचांनी मोठी दुर्घटना टळली. बस चालकानं दाखवलेल्या समयसूचकतेमुळे प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले.
चंबा-डंडी मार्गावर धावणाऱ्या एका खासगी बसला काल तेलकाजवळ अपघात झाला. बसनं रस्त्याच्या बाजूला असलेल्या पॅरापिटला धडक दिली. बससमोर अचानक एक दुचाकी आल्यानं बसच्या चालकानं दुचाकीस्वाराला वाचवण्यासाठी बस वळवली. मात्र त्याचं बसवरील नियंत्रण सुटलं. पॅरापिटला धडक देत बस दरीच्या दिशेनं जाऊ लागली.
बस दरीत कोसळणार असल्याचं दिसताच चालकानं प्रयत्नांची शर्थ केली. त्यानं ब्रेक दाबून बस थांबवली. बस काही इंच पुढे गेली असती, तर मोठा अपघात झाला असता. मात्र चालकाच्या सतर्कतेमुळे अपघात टळला आणि १२ प्रवाशांचे प्राण वाचले. बसनं पॅरापिटला धडक दिल्यानं ते कोसळलं. त्याखाली येऊन एक गाय दगावली. याआधी सिरमौर जिल्ह्यातही असाच अपघात झाला होता. त्यावेळीही रस्त्याच्या अगदी कडेला बस अडकली होती.