नवी दिल्ली - झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत. काही महिन्यापूर्वी मुख्यमंत्री बनलेल्या चंपई सोरेन यांची राजकीय कारकिर्द चर्चेत आली परंतु हेमंत सोरेन जेलमधून बाहेर येताच चंपई यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं. त्यातूनच झारखंडमध्ये राजकीय भूकंप आला. चंपई सोरेन यांनी पक्षाला रामराम करत आता भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानं फक्त चंपई सोरेन यांचाच नाही तर भाजपाचाही फायदा होणार आहे.
झारखंडच्या राजकारणात आदिवासी मते निर्णायक ठरतात. काही मतदारसंघात जय पराजय या मतांवर अवलंबून असतो. चंपई सोरेन यांच्याबाबत बोलायचं झालं तर कोल्हन परिसरात त्यांची मजबूत पकड आहे. याठिकाणी विधानसभेच्या १४ जागा येतात. इथं भाजपाला कायम पराभवाची धूळ चाखावी लागते. तर दुसरीकडे झारखंड मुक्ती मोर्चाला विजय मिळतो त्यात चंपई सोरेन यांचा मोलाचा वाटा असतो. या भागात चंपई सोरेन यांची लोकप्रियता मोठी आहे. त्यामुळे चंपई सोरेन भाजपात आले तर तर तिथली राजकीय समीकरणे बदलू शकतात.
प्रत्येक पक्षातील नंबर २, भाजपासाठी नंबर १
चंपई सोरेन यांचं भाजपात जाणं हे मोठं मानलं जातं. परंतु त्याही पेक्षा देशातील सर्वात मोठा पक्ष असलेला भाजपा सध्या दुसऱ्या पक्षातील अनेक नेत्यांना पक्षात समाविष्ट करत आहे. त्यांची नजर सर्वांवर नसते तर अशा चेहऱ्यांवर डाव लावला जातो ज्यांच्या जाण्यानं विरोधी पक्षाला जबरदस्त नुकसान होईल. सोप्या भाषेत जो नेता एखाद्या पक्षात दुसऱ्या नंबरवर आहे त्याच्यावर भाजपा डाव टाकते. जर हा चेहरा भाजपासोबत आला तर पक्षाची ताकद वाढते आणि दुसऱ्या पक्षाचं नुकसान होते.
महाराष्ट्रातही भाजपाची रणनीती, शिंदे-अजितदादांना सोबत घेतलं
महाराष्ट्राच्या राजकारणात २ चेहरे राजकीय डावपेचात पुढे आले ते म्हणजे एकनाथ शिंदे, अजित पवार. या दोन्ही नेत्यांच्या जाण्यानं त्यांच्या पक्षाला मोठं नुकसान झालं. एकनाथ शिंदे यांनी पूर्णत: शिवसेनेवर कब्जा केला आणि अजित पवार यांनीही शरद पवारांविरोधात भूमिका घेत पक्षाचं नाव आणि चिन्ह यावर दावा सांगितला. शिंदे आणि अजित पवार यांनी ४० हून अधिक आमदार फोडले. या दोन्ही राजकीय खेळीत भाजपाला फायदा झाला. ही अशीच उदाहरणे पश्चिम बंगालमध्ये शुभेंद्रु अधिकारी, मणिपूरमध्ये माणिक साहा, आसाममध्ये हेमंत बिस्वा, मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांच्याबाबतीत भाजपाने तेच केले.