झारखंडमध्ये आज नव्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आहे. हेमंत सोरेन यांना ईडीने अटक केल्यानंतर झारखंडमध्ये राजकीय उलथापालथ सुरु झाली होती. सोरेन यांचे सरकार पडणार अशा चर्चा सुरु होत्या. हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामाही दिला होता. परंतु, राज्यपालांनी नवीन सरकार बनविण्याचा प्रस्ताव काही झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाला दिला नव्हता. अखेर पुन्हा भेट घेतल्यानंतर चंपई सोरेन यांना राज्यपालांनी सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले होते.
आज राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी झामुमोचे नेते चंपई सोरेन यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. या सरकारला १० दिवसांत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. घोडेबाजार सुरु होण्याच्या भीतीने झामुमो त्यांच्या आमदारांना हैदराबादला शिफ्ट करणार आहे.
चंपई सोरेन यांच्याबरोबर काँग्रेस एक आणि राजद एक अशा दोन आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. दुसरीकडे भाजपाने आमदारांची बैठक बोलावली आहे. चंपाई सोरेन सरकार ५ फेब्रुवारीला विधानसभेत बहुमत सिद्ध करणार आहे. विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ९ फेब्रुवारीपासून सुरू आहे.
आलमगीर आलम आणि बसंत सोरेन यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राजद कोट्यातून सत्यानंद भोक्ता यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.दरम्यान, हेमंत सोरेन यांच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. उच्च न्यायालयासमोर आपली बाजू मांडावी, असे न्यायालयाने म्हटले आहे. हा सोरेन यांना धक्का असल्याचे मानले जात आहे.