बिहारमधील पश्चिम चंपारण जिल्ह्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगी आपला पती, त्याच्या कुटुंबाच्या आणि स्वतःच्या सुरक्षेची याचना करत आहे. मी स्वतःच्या मर्जीने घरातून पळून जाऊन लग्न केल्याचे मुलीचे म्हणणे आहे.
कोणीही मला समजावले नाही किंवा माझ्यावर कोणताही दबाव टाकला नाही. मी स्वतःच्या इच्छेने घरातून पळून जाऊन लग्न केलं आहे. यात माझ्या नवऱ्याचा काही दोष नाही. जर कोणी माझ्या पतीला आणि सासरच्या लोकांना दुखवण्याचा प्रयत्न केला तर मी त्यांना कोर्टात खेचेन, मग ते माझे आई-वडील असले तरी असं मुलीने म्हटलं आहे.
घरातून पळून गेलेल्या मुलीचे नाव खुशी असून तिचे वय जवळपास 19 वर्षे आहे. ही तरुणी जिल्ह्यातील योगपट्टी ब्लॉकमधील दारवालिया मिश्रौली गावची रहिवासी आहे. मुलीचे म्हणणे आहे की, सर्वप्रथम 26 जुलै रोजी पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास ती स्वत:च्या मर्जीने घर सोडून योगपट्टीहून बेतिया येथे आली. येथे आल्यानंतर तिने तिच्या भावी पतीशी बोलून तिला घरी नेण्यास सांगितले.
मुलाने नकार दिल्याने खुशीने गाडीखाली येऊन आत्महत्या करणार असल्याचं सांगितलं. यानंतर मुलगा घटनास्थळी पोहोचला आणि खुशीला सोबत घेऊन गेला. खुशीच्या म्हणण्यानुसार, मुलाने तिला खूप समजावले, पण ती तिच्या सांगण्यावर ठाम राहिली. अखेर दोघांचे लग्न झाले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.