नवी दिल्ली : उत्तर भारतात येत्या तीन ते चार दिवसांमध्ये तीव्र थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्याचा प्रभाव मध्य भारत आणि पश्चिम भारतातील काही ठिकाणी जाणवणार असून या भागातही थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू आणि काश्मीर, पंजाब, हरियाणा, राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या भागांत २५ ते २७ जानेवारीच्या कालावधीत तीव्र थंडीची लाट येऊ शकते. पारा ३ ते ४ अंशांनी घसरण्याची शक्यता आहे. या भागात अतिशय दाट धुके राहू शकते. तसेच महाराष्ट्रातील काही भागांतही थंडी वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. काश्मीरमध्ये पुन्हा बर्फवृष्टी झाली असून अनेक ठिकाणी तापमान शून्य अंशाखाली गेले आहे.
दाेघांचा मृत्यूकाश्मीरमध्ये बर्फवृष्टीमुळे जम्मू-श्रीनगर महामार्ग ठप्प झाला हाेता. त्यामुळे काश्मीरकडे जाण्यासाठी अनेक वाहने अडकली हाेती. त्यापैकी एका गाडीत दाेन जण मूर्च्छितावस्थेत आढळले हाेते. रुग्णालयात त्यांना मृत घाेषित करण्यात आले. त्यांचा मृत्यू थंडीमुळे झाला असण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे.