BJP CM Face: नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने जबरदस्त कामगिरी करत मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड काबीज केले. या विजयानंतर पक्षात मुख्यमंत्रिपदासाठी मंथन सुरू झाले आहे. पक्षातील दिग्गज नेते मुख्यमंत्रिपदासाठी फिल्डिंग लावत असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. यंदा भाजप नवीन चेहऱ्यांना मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी देईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर केला नव्हता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच तेहऱ्यावर राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये विजय मिळवून भाजपने काँग्रेसची सत्ता उलथून लावली. तर मध्य प्रदेशात असलेली आपली सत्ता राखण्यात पक्षाला यश आले. निकाल लागून तीन दिवस झाले आहेत, तरीदेखील भाजपने कोणाचे नाव जाहीर केले नाही. अशात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. तिन्ही राज्याला एखाद्या नवीन व्यक्तीला मुख्यमंत्री केले जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
मुख्यमंत्रिपदाबाबत मध्य प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणतात की, पक्ष जी जबाबदारी देईल, ती आम्ही मान्य करू. तर राजस्थानमध्ये वसुंधरा राजे, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, अर्जुन मेघवाल, बाबा बालकनाथ आणि दिया कुमारी यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. यापूर्वी वसुंधरा राजे राज्याच्या मुख्यमंत्री होत्या. छत्तीसगडमध्येही मुख्यमंत्रीपदाबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.