भुवनेश्वर : तेनास्सेरीम तट आणि अंदमान समुद्रालगतच्या भागातील कमी दाबाचा पट्टा मंगळवारी उत्तर अंदमान आणि ओडिशा तटावरील गोपालपूरपासून १३८० कि.मी. दक्षिण-पूर्वेपर्यंत पोहोचल्याने राज्याच्या किनारपट्टीवर चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने राज्य सरकारने ३० पैकी १६ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कमी दाबाचा हा पट्टा पश्चिम व पश्चिम-उत्तरेच्या दिशेने पसरण्याची शक्यता आहे. याशिवाय पुढील २४ तासांत त्याची तीव्रताही वाढेल. त्यामुळे हे दबाव क्षेत्र चक्रीवादळात परिवर्तीत होऊन ओडिशा किनारपट्टीवर धडकेल असा अंदाज आहे. दरम्यान, प्रशासनाने पारादीप आणि गोपाळपूर बंदरांसाठी क्रमांक एकचा सुदूर सुरक्षा संकेत पाठविला आहे. कमी दाबाचे क्षेत्र हे प्राथमिक अवस्थेत असल्याने तूर्तास चक्रीवादळाच्या तीव्रतेबद्दल काहीही सांगता येणार नाही; परंतु याच्या प्रभावामुळे राज्यात १० आॅक्टोबरपर्यंत पाऊस नक्कीच बरसेल, असे हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. कमी दाबाचा पट्टा विकसित होण्याचे ठिकाण आणि प्रवृत्ती मात्र गेल्या वर्षीच्या विध्वंसक फायलिन वादळाशी मिळतीजुळती आहे. (वृत्तसंस्था)
ओडिशात चक्रीवादळ धडकण्याची शक्यता
By admin | Published: October 08, 2014 2:32 AM