मोदी मंत्रीमंडळात फेरबदलाची शक्यता, या सुपरस्टारला मिळू शकतं स्थान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 02:06 PM2023-06-29T14:06:52+5:302023-06-29T14:08:23+5:30
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्यानंतर, राजकीय वर्तुळात मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा सुरू झाली आहे.
देशात 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप, सरकार आणि पक्षामध्ये काही फेरबदल करू शकतो. यात, मल्याळम सुपरस्टार सुरेश गोपी यांना मोदी मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते, असे बोलले जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्यानंतर, राजकीय वर्तुळात मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा सुरू झाली आहे.
पक्षातील काही वरिष्ठ सूत्रांनी यासंदर्भात पुष्टी केली आहे. तसेच, केंद्रीय मंत्रिमंडळाबरोबरच पक्षातही फेरबदलासंदर्भात चर्चा सुरू आहे. आगामी लोकसभा नुवडणूक जवळ येत असून काही मंत्र्यांना पक्षात काही पदे दिली जाऊ शकतात. तर काहींना सरकारमध्ये सामील केले जाऊ शकते. 140 एवढी सदस्य संख्या असलेल्या केरळ विधानसभेत भाजपकडे एकही आमदार नसल्याने, 2024 ची लोकसभा निवडणूक पक्षासाठी प्रतिष्ठेचा विषय बनला आहे.
काय म्हणाले सुरेश गोपी? -
सुरेश गोपी हे सलग दुसऱ्यांदा त्रिशूर मदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. गोपी नुकतेच 65 वर्षांचे झाले आहेत. भाजपने माझ्यासाठी बरेच काही केले आहे, त्यामुळे पक्ष मला जे काही सांगेन ते करण्यास मी तयार आहे, असे गोपी यांनी म्हटले आहे.
गोपी हे 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या शपथविधी कार्यक्रमासही उपस्थित होते. यानंतर त्यांना राज्य सभेवर पाठवण्यात आले होते. गेल्या वर्षीच त्यांचा कार्यकाळ संपला आहे.