नवी दिल्ली : आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ चंदा काेचर यांनी बँकेला व्हिडिओकाॅन कंपनीसाेबत असलेले हितसंबंध कळविले नसल्याचा दावा अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केला आहे. ईडीने मनी लाण्डरिंग लवादापुढे याचिका दाखल केली आहे. काेचर यांनी हितसंबंध कळविले असते तर त्यांना कर्ज मंजुरी करण्यासाठी नेमलेल्या समितीत त्यांचा समावेश झाला नसता, असा दावा ईडीने केला आहे.
व्हिडिओकाॅन इंटरनॅशनल लिमिटेडला देण्यात आलेले कर्ज मंजूर केल्याप्रकरणी चंदा काेचर यांच्यावर बँकेने बडतर्फीची कारवाई केली आहे. ईडीने काेचर आणि त्यांचे पती दीपक काेचर यांची ७८ काेटींची मालमत्ता जप्त केली हाेती. त्याप्रकरणी मनी लाॅण्डरिंग ऑथाेरिटीने काेचर दांपत्याला क्लीन चिट दिली हाेती. याविराेधात ईडीने याचिका दाखल करून ऑथाेरिटीवर अधिकारक्षेत्राच्या बाहेर कारवाई केल्याचा आराेप केला आहे.
सीएफएलमध्ये व्हिडिओकाॅनने १० काेटी रुपये गुंतविले हाेते. चंदा काेचर यांच्याकडे या कंपनीचे २०००-०१ मध्ये २८३५ समभाग हाेते. काेचर यांच्या वकिलांनी ईडीची याचिका तांत्रिकदृष्ट्या चुकीची असल्याचा दावा केला आहे. काेचर यांच्या न्यूपाॅवर रिन्यूएबल्स लिमिटेड कंपनीत पॅसिफिक कॅपिटलचा ५० टक्के वाटा हाेता. चंदा काेचर यांच्या खात्यातून ‘सीएफएल’मध्ये निधी वळविला जात हाेता. या सर्व व्यवहारांची माहिती त्यांनी लपविली हाेती.
बँकेला माहिती दिली नसल्याचा आरोप
ईडीने दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, चंदा काेचर यांचे आणि त्यांच्या पतीचे व्हिडिओकाॅन कंपनी तसेच कंपनीचे अध्यक्ष वेणूगाेपाल धूत यांच्यासाेबत १९९४-९५ पासून हितसंबंध हाेते. त्यामुळेच त्यांनी बँकेला हेतुपुरस्सर याबाबत महिती दिली नाही. पदावर असतानाही चंदा काेचर या क्रेडिन्शियल फायनान्स कंपनीत समभागधारक हाेत्या तसेच पॅसिफिक कॅपिटल सर्व्हिसेस प्रा. लिमिटेड या कंपनीतही त्या अधिकृत स्वाक्षरीकर्ता हाेत्या.