नवी दिल्ली : बँक घोटाळा आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी असलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर या सोमवारी अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर झाल्या. ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. व्हिडिओकॉन उद्योग समूहाला देण्यात आलेल्या कर्जाशी संबंधित हे प्रकरण आहे.ईडीने त्यांना सकाळी ११ वाजेची वेळ दिली होती. त्याआधीच त्या ईडीच्या खान मार्केट कार्यालयात हजर झाल्या. मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये त्यांचा जबाब नोंदविण्याचे काम ईडी करीत आहे. काही दिवसांपूर्वी ईडीने चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर आणि दीर राजीव कोचर यांचीही चौकशी केली आहे. त्याआधी ईडीच्या मुंबई कार्यालयातही त्यांची चौकशी करण्यात आली होती.या प्रकरणात १ मार्च रोजी ईडीने धाडी टाकल्या होत्या. चंदा कोचर यांच्यासह त्यांचे कुटुंबीय तसेच व्हिडिओकॉन उद्योग समूहाचे प्रमुख वेणुगोपाल धूत यांच्या मुंबई आणि औरंगाबादेतील ठिकाणांवर धाडी टाकण्यात आल्या होत्या.आयसीआयसीआय बँकेने व्हिडिओकॉन उद्योग समूहाला १,८७५ कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. या कर्जाच्या बदल्यात व्हिडिओकॉन समूहाच्या वतीने चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या एका कंपनीत गुंतवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे. ही गुंतवणूक नंतर कंपनीला बहाल केल्याचाही आरोप आहे. याप्रकरणी सीबीआयने एफआयआर दाखल केलेला असून, त्यावरून ईडी तपास करीत आहे.या प्रकरणात व्हिडिओकॉन समूहातील व्हिडिओकॉन इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्स लि. आणि व्हिडिओकॉन इंडस्ट्रीज लि. या कंपन्यांनाही सीबीआयने आरोपी केलेले आहे. याशिवाय धूत यांनी स्थापन केलेली सुप्रीम एनर्जी आणि दीपक कोचर यांची नूपॉवर रिन्यूएबल्स ही कंपनीही आरोपी आहे.
मनी लाँड्रिंग चौकशीसाठी चंदा कोचर ‘ईडी’समोर; व्हिडिओकॉन कर्जप्रकरणी घेतला जबाब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 5:42 AM