उत्तर प्रदेशातील चंदौली येथे एक कार कालव्यात पडली. या अपघातातकारमधून प्रवास करणारे पाच तरुण थोडक्यात बचावले आहेत. बऱ्याच प्रयत्नांनंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी कालव्यात बुडालेल्या कारमधून तरुणांना बाहेर काढलं. मात्र चौकशीनंतर आता याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी कार जप्त केली असून पाच तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांची जेलमध्ये रवानगी केली आहे.
स्टंटबाजीमुळे कार कालव्यात पडल्याचं तपासात समोर आलं आहे. तरुण पिकनिकला गेले होते आणि बेदरकारपणे गाडी चालवत होते, त्यामुळे हा अपघात झाला. हे पाचही तरुण दीनदयाळ नगर येथील सिकथिया भागातील रहिवासी आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
२५ सप्टेंबर रोजी चंदौलीच्या चकिया कोतवाली परिसरात एक अनियंत्रित कार कालव्यात पडली होती. या कारमध्ये मुगलसराय कोतवाली परिसरात राहणारे पाच तरुण होते, ते पिकनिकला गेले होते. कालव्यात पडलेली कार पाण्यात तरंगत होती, त्याचा व्हिडीओही व्हायरल झाला.
अपघाताच्या वेळी तेथे उपस्थित ग्रामस्थ आणि पोलिसांमुळे तरुणांचा जीव वाचला आहे. यानंतर पोलिसांनी कालव्यात पडलेल्या कारला बाहेर काढलं. मात्र आता या प्रकरणाला नवा ट्विस्ट आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान स्टंटबाजीमुळे हा अपघात झाल्याचं समोर आलं आहे.
गाडीतील तरुण स्टंटबाजी करत सुसाट वेगाने गाडी चालवत वळण घेत होते. त्यामुळे हा अपघात झाला. तपासात असं तथ्य समोर आल्यानंतर पोलिसांनी कारमधील या पाच तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करून दंड ठोठावला. तसेच कार जप्त करण्यात आली.