नवी दिल्ली : संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेचे (डीआरडीओ) प्रमुख अविनाश चंदर यांची अचानक हकालपट्टी करण्याचा निर्णय वादग्रस्त ठरला असताना संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर या निर्णयाची पाठराखण करताना दिसले़ डीआरडीओ प्रमुखपदी एखाद्या नव्या दमाच्या युवा नेत्याची वर्णी लागावी, अशी शिफारस मीच केल्याचे पर्रीकर यांनी बुधवारी स्पष्ट केले़ अर्थात मी शिफारस केली असली तरी चंदर यांना हटविल्याची माहिती मला मीडियाद्वारे मिळाली, असा दावाही त्यांनी केला़चंदर यांना करार संपण्याच्या १५ महिन्यांपूर्वीच मंगळवारी रात्री अचानक यावर्षी ३१ जानेवारीपासून तत्काळ प्रभावाने सेवामुक्त करण्यात आले़ चंदर गत ३० नोव्हेंबरला सेवानिवृत्त झाले होते़ त्यानंतर एका करारांतर्गत त्यांना पुढील वर्षी ३१ मेपर्यंत १८ महिन्यांचा सेवा विस्तार देण्यात आला होता़ मात्र मंगळवारी रात्री अचानक त्यांचा करार संपुष्टात आणून, येत्या ३१ जानेवारीपासून त्यांना सेवामुक्त करण्यात आले़ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील नियुक्ती समितीने चंदर यांच्या हकालपट्टीला मान्यता दिली़यावर वाद निर्माण होण्याची चिन्हे असतानाच, पर्रीकर यांनी उपरोक्त खुलासा केला़ डीआरडीओ प्रमुखपदावर कराराच्या आधारावर कुणाचीही नियुक्ती व्हायला नको, अशी शिफारस मीच केली होती़ आपल्याला विज्ञान क्षेत्रात नव्या पिढीला संधी द्यायला हवी, असे पर्रीकर पत्रकारांशी बोलताना म्हणाले़डीआरडीओचा नवा प्रमुख कोण असेल असे विचारले असता, तूर्तास आहे त्यापैकी सर्वाधिक ज्येष्ठ व्यक्ती अस्थायी रूपात प्रभार सांभाळेल, असे त्यांनी स्पष्ट केले़ अनेक पात्र व्यक्ती आहेत़ यापैकी एखाद्याची या पदावर वर्णी लागावी़ विकासासाठी प्रबळ इच्छाशक्ती असलेली एखादी पात्र व्यक्ती आम्ही शोधू, अशी पुस्तीही त्यांनी जोडली़ चंदर हे डीआरडीओमध्ये संरक्षण संशोधन आणि विकास सचिव तसेच डीआरडीओचे महासंचालक होते़; सोबतच संरक्षणमंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागारही होते़ आयआयटी, दिल्लीत इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतल्यानंतर ते १९७२ मध्ये डीआरडीओमध्ये दाखल झाले होते़ गतवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीआरडीओमध्ये ‘कामचुकारपणा’ खपवून घेतला जाणार नाही, असे विधान केले होते़ या पार्श्वभूमीवर चंदेर यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे मानले जात आहे़ (लोकमत न्यूज नेटवर्क)
युवा व्यक्तीला संधी मिळावी म्हणून चंदर यांना हटविले
By admin | Published: January 15, 2015 6:18 AM