Hear Attack Death : वर्कआउट(व्यायाम) किंवा एखादं काम करताना अचानक हृदयविकाराच्या झटक्यानं (Cardiac Arrest) मृत्यू होण्याच्या घटना देशात वाढत आहेत. चंदीगडमधील दादू माजरा परिसरात असाच एक प्रकार समोर आला आहे. एका 33 वर्षीय तरुण बॉडीबिल्डरचा आळस देताना मृत्यू झाला. राम राणा असे या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राम राणा त्याच्या मित्रांसोबत उभा होता, यावेळी त्यानं हात पसरवून आळस दिला अन् कोसळला. मित्रांना वाटलं तो स्ट्रेचिंग करतोय, पण काही वेळानंतर त्याच बोलणं थांबलं. यानंतर मित्रांनी त्याला चंदीगडच्या सेक्टर 16, जीएमएच हॉस्पिटलमध्ये नेलं, पण तोपर्यंत उशीर झाला होता. राम राणाला तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केलं.
राम राणाच्या कुटुंबीयांनी सांगितलं की, त्याला कोणताही आजार नव्हता. तो एकदम निरोगी होता आणि रोज जिममध्ये व्यायाम करायचा. त्याला कोणत्याही प्रकारचे वाईट व्यसनही नव्हते. अंमली पदार्थांपासून तर तो दूरच राहायचा. इतकच नाही, तर तो बाहेरचं अन्नही खात नव्हता. राम राणा यांना 11 आणि 3 वर्षांची दोन मुलं आहेत.
काँग्रेस खासदाराचा मृत्यूदरम्यान, गेल्या शनिवारी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेदरम्यान जालंधरचे काँग्रेस खासदार चौधरी संतोख सिंग (76) हेही अचानक जमिनीवर पडले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. संतोख सिंग यांनाही कुठलाच आजार नव्हता. चंदीगड पीजीआयचे एचओडी (इंटर्नल मेडिसिन) प्रा. संजय जैन म्हणतात की, अशा प्रकरणांमध्ये कार्डियाक ऍरिथमियाची शक्यता असते. म्हणजेच हृदयाच्या गतीमध्ये अनियमितता किंवा अचानक हृदयविकाराचा झटका येतो. अनेक वेळा लवकर पोस्टमॉर्टम केल्यावर हृदयविकाराचा झटकाही आढळत नाही.