नवी दिल्ली : तुम्ही काही मतपत्रिकांवर इंग्रजी ‘एक्स’ अक्षरात खूण केली की नाही, असा थेट प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने चंडीगड महापौर निवडणूक अधिकारी अनिल मसिह यांना विचारला. त्यावर मसिह यांनी अवैध ठरलेल्या आठ मतपत्रिकांवर खूण केल्याचे मान्य केले. त्यामुळे मतपत्रिकांशी छेडछाड केल्याचे स्पष्ट झाल्याने मसिह यांच्यावर खटला भरावा, असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले.
महापौरपदाच्या निवडणुकीतील सर्व मतपत्रिका व मतदान प्रक्रियेचे व्हिडीओ रेकॉर्डिंग सर्वोच्च न्यायालयाने मागवून घेतले. त्या सुरक्षितरित्या आणाव्यात, असे आदेश सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने हायकोर्टाच्या रजिस्ट्रार जनरलना दिले. पुढील सुनावणी मंगळवारी होणार आहे.
...म्हणून सीसीटीव्हीकडे पाहत होतो...
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक अधिकारी अनिल मसिह खंडपीठासमोर हजर झाले. काही मतपत्रिकांच्या छेडछाडीबद्दल न्यायाधीशांनी त्यांच्याकडे विचारणा केली. त्यावेळी मसिह म्हणाले की, आम आदमी पक्षाच्या नगरसेवकांनी सभागृहात गदारोळ माजविण्याचा तसेच मतपत्रिका पळविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला. या गदारोळामुळेच मी मतमोजणी केंद्रातील सीसीटीव्हीकडे पाहत होतो.
महापौर निवडणुकीत काय घडले होते?
चंडीगड महापौरपदासाठी नव्याने निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका ‘आप’ने पंजाब, हरयाणा उच्च न्यायालयात केली होती. त्यावर अंतरिम दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिल.
या आदेशाविरोधात ‘आप’चे नगरसेवक कुलदीपकुमार यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. ३० जानेवारी रोजी झालेल्या या निवडणुकीत आप-काँग्रेस आघाडीचा पराभव करून भाजपने आपला उमेदवार महापौरपदी निवडून आणला होता.
भाजपच्या मनोज सोनकार यांना १६ तर ‘आप’चे उमेदवार कुलदीपकुमार यांना १२ मते मिळाली होती. या निवडणुकीबाबत गदारोळ झाल्यानंतर सोनकार यांनी महापौरपदाचा राजीनामा दिला होता.