Farmers' Protest : (Marathi News)चंदीगड : हरयाणातील शेतकरी (Farmers) आंदोलनामुळे पंजाबमधील (Punjab) तीन जिल्ह्यांमध्ये इंटरनेट बंद करण्यात आले आहे. पंजाबमधील तीन जिल्ह्यांमध्ये 16 फेब्रुवारीपर्यंत शंभू सीमा आणि खनौरी सीमेच्या आसपासच्या भागात इंटरनेट सेवाही विस्कळीत झाली आहे. तसेच, पंजाबच्या बटिंडा आणि पटियालामध्ये शेतकरी रेल्वे रुळांवर बसले आहेत. सध्या शंभू सीमेवर शेतकरी शांत बसले आहेत. पोलिस आणि निमलष्करी दलाकडून फारशी कारवाई झालेली नाही.
सीमेवर सुरक्षा व्यवस्था कडेकोट आहे. हरयाणामध्ये प्रवेश करण्यासाठी पोलिसांव्यतिरिक्त निमलष्करी दलाचे जवान सीमेवर तैनात करण्यात आले आहेत. दुसरीकडे, सुरक्षेसाठी तैनात असलेल्या बीएसएफ जवानांच्या तब्येतीवर परिणाम होऊ लागला आहेत. राज्यातील बहादूरगडमध्ये 11 जवान आजारी पडल्याची बातमी आहे. या जवानांना बहादुरगड येथील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा कर्मचारी जेवण केल्यानंतर आजारी पडले आहेत. प्रत्येकजण लूज मोशनची तक्रार करत असून आता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एकूण 11 जवानांची प्रकृती खालावली असल्याचे सांगण्यात येत आहे. प्राथमिक उपचारानंतर पाच जवानांना डिस्चार्ज देण्यात आला असून सहा जवानांवर अजूनही उपचार सुरू आहेत.
बीएसएफ आणि आयटीबीपीचे हे जवान टिकरी सीमेपूर्वी सेक्टर 9 ठिकाणी तैनात करण्यात आले होते. बीएसएफची तुकडी गर्ल्स कॉलेज, बहादूरगड येथे तैनात करण्यात आली आहे. शेतकरी आंदोलनासंदर्भात संपूर्ण हरयाणा राज्यात एकूण 114 सुरक्षा कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. या कंपन्यांपैकी 64 पॅरा मिलिटरी फोर्सेसच्या तर 50 कंपन्या हरयाणा पोलिसांच्या आहेत. हे जवान सलग तीन दिवस सीमेवर पहारा देत आहेत. दरम्यान, दिल्लीत प्रवेश टिकरी सीमेवरून होतो.
आंदोलनाचा आजचा तिसरा दिवसशेतकरी आंदोलनाचा गुरुवारी तिसरा दिवस आहे. हरयाणाच्या शंभू आणि खनौरी सीमेवर शेतकरी ठाण मांडून आहेत. कडक पोलीस बंदोबस्तामुळे गेल्या 72 तासांत शेतकरी सीमा ओलांडू शकलेले नाहीत. मात्र, याठिकाणीच शेतकरी दिवस-रात्र ठाण मांडून बसले आहेत. येथेच त्यांच्या खाण्या-पिण्याची सोय केली जात आहे. गुरुवारी संध्याकाळी 5 वाजता चंदीगडच्या सेक्टर 26 मध्ये सरकार आणि शेतकरी पुन्हा एकदा चर्चा करणार आहेत. सध्या या चर्चेनंतर शेतकरी पुढील रणनीती ठरवणार आहेत.