बहुमत असतानाही सत्ता हातून गेली! चंडीगडमध्ये आपचा भाजपवर निशाना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 06:42 AM2024-01-31T06:42:00+5:302024-01-31T06:42:28+5:30
Chandigarh Mayor Election 2024: बहुमत असतानाही ८ मते बाद ठरविल्याने काँग्रेस-आम आदमी पार्टी (आप) आघाडीचा पराभव करून भाजपने चंडीगड महानगरपालिका ताब्यात घेतली आहे. महापौर, वरिष्ठ उपमहापौर व उपमहापौर या तिन्ही पदांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत.
- बलवंत तक्षक
चंडीगड : बहुमत असतानाही ८ मते बाद ठरविल्याने काँग्रेस-आम आदमी पार्टी (आप) आघाडीचा पराभव करून भाजपने चंडीगड महानगरपालिका ताब्यात घेतली आहे. महापौर, वरिष्ठ उपमहापौर व उपमहापौर या तिन्ही पदांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत.
निवडणुकीत हेराफेरीचा आरोप करीत आप, काँग्रेसच्या नेत्यांनी पुन्हा उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. पीठासीन अधिकाऱ्यांवर कारवाई करून निवडणूक रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवडणुकीचे समीकरण आप व काँग्रेसच्या बाजूने होते. दोन्ही पक्षांचे २० नगरसेवक असून, अकाली दलाचाही १ नगरसेवक आहे. तर भाजपचे १५ नगरसेवक आहेत.
नेमके काय झाले?
बाद ठरलेली मते उमेदवारांच्या प्रतिनिधींना न दाखवता निवडणूक निर्णय अधिकारी निघून गेले. याला काँग्रेस-आप आघाडीचे उमेदवार व नेत्यांनी आक्षेप घेतला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची ही कृती निवडणूक नियमांचे उल्लंघन असल्याचा आरोप त्यांनी केला.
मतपत्रिका फाडल्या
भाजप नगरसेवक आणि अधिकाऱ्यांनी काँग्रेस-आपच्या प्रतिनिधींना मतपत्रिकांची छाननी करू दिली नाही. भाजप सदस्य टेबलकडे धावले व तेथील मतपत्रिका त्यांनी फाडून टाकल्या, असा आरोप काँग्रेसने केला.
‘ते’ कोणत्याही थराला जाऊ शकतात : केजरीवाल
चंडीगड महापौरपदाच्या निवडणुकीत ज्या पद्धतीने अप्रामाणिकपणा करण्यात आला तो अत्यंत चिंताजनक आहे, असे दिल्लीचे मुख्यमंत्री व आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. जे महापौरपदाच्या निवडणुकीत एवढ्या खालच्या थराला जाऊ शकतात, ते देशाच्या सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्या थराला जाऊ शकतात, हे सहज लक्षात येते, असा घणाघातही त्यांनी केला.
काळा दिवस : मान
हा दिवस देशाच्या इतिहासात काळा दिवस म्हणून स्मरणात राहील. ही फसवणूक लोकसभेत होऊ शकते, अशी भिती पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी व्यक्त केली.
हा देशद्रोह : चढ्ढा
आप नेते राघव चढ्ढा यांनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ही प्रक्रिया केवळ ‘घटनाबाह्य आणि बेकायदा’ नाही, तर देशद्रोहाची कृतीदेखील आहे, असेही ते म्हणाले.