काही दिवसांपूर्वी महापौर निवडणुकीमुळे देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या चंडीगड महानगरपालिकेमध्ये घडलेल्या घटनेची सध्या चर्चा होत आहे. चंडीगड महानगरपालिकेमध्ये आज अर्थसंकल्पावर चर्चेदरम्यान एका मांजराने सभागृहात घुसखोरी केली. सभागृहात जोराजोरात म्यॅव-म्यॅव असा आवाज येऊ लागला. अचानक मांजर घुसल्याने आम आदमी पक्षाच्या नगरसेवकांची पळापळ उडाली.
समोर येत असलेल्या माहितीनुसार, पालिका सभागृहात बुधवारी अर्थसंकल्पाबाबत काँग्रेस आणि आपचे नगरसेवक पोहोचले होते. मात्र त्याचवेळी मांजरीच्या आवाजामुळे सभागृहाची शांतता भंग झाली. अचानक मांजर आल्याने नगरसेवकांचा गोंधळ उडाला. मांजरीचा आवाज येऊ लागल्यानंतर नगरसेवकांनी या मांजरीची सुटका करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
हे मांजर सभागृहातील भिंतीवर अडकले होते. त्यानंतर नगरसेवक त्या मांजरीला वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते. अखेरीस या मांजरीची सुटका झाली आणि सभागृहाचं कामकाजही पुढे सुरू झालं. यादरम्यान, सभागृहातील अर्थसंकल्पावरील चर्चा रद्द करण्यात आली. त्यावरूनही आता वादाला सुरुवात झाली आहे. आप आणि काँग्रेसचे नगरसेवक बेकायदेशीरपणे बैठका घेत आहेत. सभागृहात आयुक्त, अधिकारी आणि भाजपाचे नगरसेवक उपस्थित नसताना हे अर्थसंकल्पावर कशी काय चर्चा करू शकतात, असा प्रश्न भाजपाचा एका नगरसेवकाने उपस्थित केला आहे.