- बलवंत तक्षक
चंदीगड : चंदीगड महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाने (आप) ३५ पैकी १४ जागा जिंकून सगळ्यात मोठ्या पक्षाचे स्थान मिळवले तर भाजपला १२, काँग्रेसला ८ आणि एक जागा शिरोमणी अकाली दलाला जिंकता आली. महापौरपदासाठी पक्षाला १९ नगरसेवकांचा पाठिंबा आवश्यक आहे.
पक्षाच्या कामगिरीमुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल खूपच आनंदी आहेत. त्यांनी ट्वीटवर म्हटले की, “या यशामुळे पंजाबमध्येही बदल घडेल, असे संकेत मिळतात. राज्यात फेब्रुवारीत विधानसभा निवडणूक होत आहे. चंदीगढमधील मतदारांनी भ्रष्ट राजकारण करणाऱ्यांना नाकारून ‘आप’ च्या प्रामाणिक राजकारणाला निवडून दिले आहे.”
काँग्रेसलाही नाकारले २४ डिसेंबरला मतदान झाले व ६० टक्क्यांपेक्षा जास्त मतदारांनी मतदान केले. सोमवारी सकाळी मतमोजणी झाली. काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांच्या तुलनेत आपचे उमेदवार अनुभवी नव्हते तरीही मतदारांनी दोन्ही मोठ्या पक्षांना नाकारून ‘आप’वर विश्वास टाकला. भाजपचे महापौर रविकांत शर्मा यांचा या निवडणुकीत पराभव झाला.