चंदीगड- पुलवाम्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात सिद्धू यांनी केलेल्या विधानानंतर पंजाब विधानसभेत मोठा गदारोळ झाला. पंजाबच्या अकाली दलानं विधानसभेत सिद्धूला खडे बोल सुनावले आहेत. अकाली दलाचे नेते बिक्रम सिंह मजीठिया आणि सिद्धू यांच्यात वादविवाद झाले आहेत. सभागृहात मजीठिया यांनी सिद्धूला गद्दार असं संबोधलं आहे, तर सिद्धू यांनी मजीठिया यांना डाकू असं म्हटलं आहे.दोन्ही नेत्यांनी एकमेकांविरोधात अपशब्द वापरले. त्यानंतर मोठा गदारोळ झाल्यानं पंजाब विधानसभेच्या अर्थसंकल्पाचं भाषण थांबवण्यात आलं. सिद्धूच्या विरोधात अकाली दल आणि भाजपा नेत्यांनी वॉक आऊट केलं. बिक्रम सिंह मजीठिया यांनी नवज्योत सिंग सिद्धूचे पाकिस्तान दौऱ्यातील पाक आर्मी चिफ जनरल बावजांच्या गळाभेटीचे फोटो दाखवले. तसेच खलिस्तान समर्थक गोपाल चावला यांचे फोटो दाखवले. तसेच पाकिस्तानचे झेंडे जाळण्याचाही प्रयत्न केला आहे. अकाली दलानं सिद्धूवर गंभीर आरोप केले आहेत.अमरिंदर सिंग पाकिस्तानला धडा शिकवण्याची भाषा करत असतानाच सिद्धू शांत राहण्याचं आवाहन करत आहे. सिद्धूला भारतापेक्षा इम्रान खान यांची मैत्री महत्त्वाची वाटते. मजीठिया म्हणाले, पूर्ण देशाला माहीत आहे की, पाकिस्तान हा दहशतवादी देश आहे. जो दहशतवाद्यांचा उपयोग भारताविरोधात कारवाई करण्यासाठी करतो. तरीही नवज्योत सिंग सिद्धू हे पाकिस्तानबरोबर चर्चा करण्याची भाषा करत आहेत. पाकिस्तानचा विरोध करत नाहीत. त्यामुळे पंजाब सरकारनं सिद्धूसंदर्भात स्वतःची भूमिका स्पष्ट करावी. त्यानंतर पंजाब विधानसभेत अर्थसंकल्प सादर करण्याची परवानगी दिली जाईल. अकाली दलानं सिद्धू यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी ठिकठिकाणी विरोध प्रदर्शनही केलं आहे.
'गद्दार' म्हटल्यानं सिद्धू खवळला, पंजाबच्या विधानसभेत 'राडा' झाला!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 3:25 PM