नवी दिल्ली, दि. 9 - चंदीगडमध्ये आयएएस अधिका-याच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलेलं असतानाच आता भाजपाच्या खासदार किरण खेर यांनी या वादात उडी घेतली आहे. मुली व मुलांमध्ये भेदभाव न करता दोघांनाही सारखेच नियम लावायला हवेत. रात्रीच्या दरम्यान एकट्या मुलीनं रस्त्यावर फिरणे चुकीचं वाटत असल्यास तरुणांनाही रात्री घराबाहेर पडू न देता घरातच ठेवलं पाहिजे, असं मत किरण खेर यांनी व्यक्त केलं आहे. तसेच तरुणींना दिवसाची भीती वाटत नाही, मग रात्रीचीच भीती का वाटते ?, त्यामुळे रात्रीचं मुलांना घराबाहेर पाठवू नका, असा सल्लाही किरण खेर यांनी दिला आहे. आयएएस अधिका-याची मुलगी वर्णिका कुंडूसोबत छेडछाड केल्याच्या आरोपाखाली भाजपा नेता सुभाष बराला यांचे सुपुत्र विकास बराला याला पुन्हा एकदा अटक करण्यात आली आहे. विकास बराला याच्यासोबत त्याचा मित्र आशिष यालाही अटक केलीय. पोलिसांनी चौकशीसाठी विकासला पोलीस ठाण्यात बोलावलं होतं. दुपारी अडीच वाजता विकास बराला पोलीस ठाण्यात पोहोचला होता. चौकशी केल्यानंतर त्याला ताब्यात घेतलं. विकास बरालाविरोधात अपहरणाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेचं सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागले असून, सीसीटीव्हीत विकास बराला वर्णिकाचा पाठलाग करताना स्पष्ट दिसत आहे.काय आहे प्रकरण -हरियाणा भाजप प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांचा मुलगा विकास बराला याच्यावर एका मुलीचा पाठलाग व छेडछाड केल्याचा आरोप आहे. प्रदेशाध्यक्षांचा मुलगा कायद्याचा विद्यार्थी आहे. पीडित मुलगी आयएएस अधिका-याची मुलगी आहे. शुक्रवारी चंदीगडमधील सेक्टर 9 येथून चालली होती. तेव्हा एक टाटा सफारी कार पाठलाग करीत आहे, असे तिच्या लक्षात आले. तिने तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला. पोलिसांनी दोघांना अटक केली, तेव्हा ते दोघेही दारूच्या नशेमध्ये होते. हरिणाया भाजपाध्यक्ष सुभाष बराला यांनी दिल्लीतल्या भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडे या प्रकरणाबाबत स्पष्टीकरण दिलं.
…तर तरुणांना रात्री घरातच ठेवलं पाहिजे – किरण खेर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2017 9:41 PM