Chandigarh University Girls Hostel Videos leak: पंजाबच्या मोहालीमध्ये (Mohali) चंडीगड विद्यापीठात एक अतिशय घृणास्पद घटना घडली. विद्यापीठातील महाविद्यालयीन विद्यार्थीनीने आपल्या तब्बल ६० मैत्रिणींचे आंघोळ करतानाचे व्हिडिओ रेकॉर्ड केले आणि ते इंटरनेटवर व्हायरल केल्याची धक्कादायक घटना घडली. हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे लक्षात आल्यानंतर हॉस्टेलच्या ८ विद्यार्थीनींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्या असून त्यातील काही विद्यार्थीनींची प्रकृती गंभीर आहेत. याशिवाय मोठ्या संख्येने महाविद्यालयाच्या गेट नंबर २ वर पीडित विद्यार्थीनींनी निदर्शने केली आणि कारवाईची मागणी केली. याबाबत पोलिसांना पाचारण करण्यात आले आणि कारवाईचे आश्वासन मिळाल्यानंतर पीडित विद्यार्थीनी शांत झाल्या. तसेच, ट्विटरवर justiceforCUgirls असा हॅशटॅगही ट्रेंड झाला. त्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी घेतली असून त्यांनी एक ट्वीट केले आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, या घृणास्पद कृत्य उघड झाल्यानंतर विद्यार्थींना धक्का बसला. त्यानंतर याबाबत हॉस्टेलमध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाला. काहींना तो धक्का पचवता न आल्याने तब्बल ८ विद्यार्थिंनींनी आत्महत्येचा प्रयत्न केला, त्यापैकी एका विद्यार्थीनीची प्रकृती गंभीर आहे, तर इतर विद्यार्थिंनीवरही उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची CM भगवंत मान यांनी गंभीर दखल घेतली. 'चंदीगढ विद्यापीठातील घटनेबाबत ऐकून मला अतिशय दु:ख झाले आहे. आपल्या मुली ही आपला अभिमान आहेत. त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जे कोणी या प्रकरणात दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल', असे ट्वीट मान यांनी केले. तसेच, आपण स्वत: प्रशासनाच्या सतत संपर्कात राहून या प्रकरणावर लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय, या प्रकरणासंबधी अफवांपासून सावध राहा, असे आवाहनही त्यांनी जनतेला केले आहे.
नक्की काय घडलं?
चंडीगड युनिव्हर्सिटीमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला. मध्यरात्री जवळपास अडीच वाजता काही विद्यार्थीनी युनिव्हर्सिटीच्या गेटजवळ पोहोचल्या आणि जोरजोरदात घोषणाबाजी करू लागल्या. मुलींच्या वसतीगृहातील एका मुलीनं आपल्या सहकारी विद्यार्थींनीचे आंघोळ करतानाचे व्हिडिओ रेकॉर्ड केले. एक दोन नव्हे, तर तब्बल ६० विद्यार्थींनीचे व्हिडिओ तिनं रेकॉर्ड केले होते. हे व्हिडिओ ती एका मुलाला पाठवत असे. संबंधित मुलगा हे व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड करत होता. हे धक्कादायक प्रकरण युनिर्व्हसिटीच्या प्रशासनाला लक्षात येताच पोलिसांना पाचारण करण्यात आलं. पोलीस संपूर्ण प्रकरणाची आता चौकशी करत आहेत.
व्हिडीओ रेकॉर्ड करणारी मुलगी सापडली!
युनिव्हर्सिटीच्या गेटवर जाऊन रात्री उशीरा विद्यार्थीनींनी जोरदार हंगामा केला. त्यानंतर आरोपी विद्यार्थीनीची ओळख पटवण्यात आली. तिनं आपला गुन्हा कबूल करत खूप आधीपासूनच विद्यार्थीनींचे व्हिडिओ रेकॉर्ड करत असल्याचे मान्य केले. तसेच, ती हे व्हिडिओ ज्या मुलाला पाठवत होती तो शिमला येथील रहिवासी असून हे व्हिडीओ तो वेबसाईट्सवर अपलोड करतो असेही तिने सांगितले. या माहितीनुसार, पोलिस पुढील तपास करत आहेत.