पंजाब आणि हरियाणाची राजधानी चंदीगडमध्ये तीन महिलांमधील भांडणाचा व्हिडीओ समोर आला आहे. रविवारी ही घटना घडली. रस्त्यावर चुकीच्या बाजूने गाडी चालवल्यावरून सुरू झालेल्या वादात तिन्ही महिलांमध्ये हाणामारी झाली आणि त्यांनी एकमेकींना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. नंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यातही पोहोचले. सोशल मीडियावर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना चंदीगडच्या सेक्टर 34 मधील आहे. जिथे एक तरुणी चुकीच्या बाजूने गाडी चालवत होती तेव्हा लोकांनी तिला अडवले. मुलीने लोकांचे ऐकले नाही आणि नंतर तिने एका गाडीला धडक दिली. टॅक्सीत बसत असताना दोन्ही महिलांनी मुलीला अडवलं.
मुलगी खूप संतापली आणि तिने भांडायला सुरुवात केली. या घटनेचा व्हिडीओही समोर आला असून, यामध्ये तिन्ही महिला एकमेकींना लाथा मारत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. महिलांनी मुलीला मारहाण केली असून तिचे केसही ओढताना दिसत आहेत. यामुळे भररत्यात मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं.
टॅक्सी चालकाने तात्काळ पोलिसांना फोन केला आणि मुलगी चुकीच्या पद्धतीने वाहन चालवत असल्याचे सांगितले. याच दरम्यान तिने टॅक्सीमधील दोन महिलांनाही मारहाण केली. त्यानंतर या तिन्ही महिलांना सेक्टर 34 पोलीस ठाण्यात नेण्यात आले आणि तेथे संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. सध्या या घटनेची चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.