मुंबई - भारताचं मिशन चंद्रयान ३ यशस्वी झाल्याचा आनंद देशभरात साजरा होत आहे. त्यातच, आज चंद्राचं वेगळं रुप भारतीयांना पाहायला मिळणार आहे. आज श्रावण महिन्यातील नारळी पौर्णिमा असून चंद्र वेगळ्याच रुपात पाहायला मिळत आहे. आकाशात एक दुर्मिळ सुपर ब्लू मून अवतरलं आहे. वर्षातील सर्वात मोठा आणि तेजस्वी चंद्र असून सुपर ब्लू मून ही घटना दशकातून एकदाच घडत असल्याचं खगोलीय शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. चंद्राचं हे रुप डोळ्यात साठवणारं आहे.
चंद्र आज पृथ्वीच्या सर्वात जवळ आणि लक्षणीयरीत्या मोठा दिसणार असल्यामुळे त्याला सुपरमून असे म्हणतात. पृथ्वीपासून आज चंद्र ३५७,२४४ किमी अंतरावर असेल. ऑगस्टच्या पहिल्या पौर्णिमेनंतर ऑगस्ट महिन्यात येणारी आजची दुसरी आणि श्रावणातील पहिली पौर्णिमा आहे. आज दिसणाऱ्या चंद्राला ब्लू मून म्हटले जाईल.
आकाशात एकाचवेळी पूर्ण चंद्र, सुपरमून आणि ब्लू मून एकत्र दिसत आहे. यालाच खगोलीय भाषेत 'सुपर ब्लू मून' म्हणतात. आकाशात 'सुपर ब्लू मून' पाहण्याची आज पर्वणी ठरलीय. सुपर ब्लू मून ब्रिटनमध्ये रात्री ८.०८ वाजता दिसायला सुरू झाला असून अमेरिकेत स्थानिक वेळेनुसार ७.४५ वाजता दिसत आहे. भारतात सूर्यास्तानंतर रात्री ८.३० नंतर सुपर ब्लू मून दिसत आहे.
सोशल मीडियावरही सुपर ब्लू मून ट्रेंड होत असून नेटीझन्सकडून आपल्या मोबाईलमध्ये चंद्राचा हा नजारा कैद केला जात आहे. तसेच, व्हिडिओ आणि फोटो अपलोड करत सोशल मीडियावरही ब्लू मून नेटीझन्सला पाहायला मिळत आहे.