नवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू हे ११ फेब्रुवारी रोजी दिल्लीत केंद्र सरकारचा धरणे आंदोलन करून निषेध करणार आहेत. यासाठी लोकांची ने-आण करण्यासाठी राज्य सरकारने विशेष दोन रेल्वे भाड्याने घेतल्या आहेत. ही माहिती अमरावतीत अधिकाऱ्याने शनिवारी दिली.या दोन रेल्वे प्रत्येकी २० डब्यांच्या असून, त्या दक्षिण मध्य रेल्वेकडून घेण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने १.१२ कोटी रुपये दिले आहेत. या विभागाने दिलेल्या आदेशानुसार अनंतपूर आणि श्रीकाकुलम येथून राजकीय पक्ष, संघटना, स्वयंसेवी संस्थांच्या नेत्यांना या रेल्वे दिल्लीला एक दिवसाच्या ‘दीक्षा’ धरणे आंदोलनात भाग घेण्यासाठी नेतील व दोन्ही रेल्वे रविवारी सकाळी दहा वाजता दाखल होतील.आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यास केंद्र सरकारने दिलेला नकार आणि आंध्र प्रदेश पुनर्रचना कायदा, २०१४ मध्ये देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याबद्दल हे धरणे आंदोलन आहे. एन. चंद्राबाबू नायडू हे तेलगू देसम पक्षाचे अध्यक्षही आहेत. त्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही ही निदर्शने यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे. भाजपेतर पक्षांचे नेते नायडू यांच्या या धरणे आंदोलनात सहभागी व्हायची अपेक्षा आहे.
‘दीक्षा’ धरणे आंदोलनासाठी चंद्राबाबूंनी भाड्याने घेतल्या रेल्वे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2019 1:07 AM