नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या निकालात अर्धवट जनादेशामुळे भाजपाला दिल्लीच्या सत्तेवर मजबुतीनं उभं राहण्याची स्थिती नाही. २०१४ आणि २०१९ या काळात भाजपाला एकट्याला स्पष्ट बहुमत मिळालं होतं. मात्र यंदा भाजपा बहुमतापासून ३२ पाऊले दूर आहे. भाजपाला लोकसभेत सर्वाधिक २४० जागा मिळाल्यात परंतु त्यांना स्पष्ट बहुमत मिळालं नाही. त्यामुळे २ दशकानंतर केंद्रातील सत्तेच्या खुर्चीवर बसणाऱ्या नेत्यांना प्रादेशिक पक्षांवर नजर ठेवावी लागत आहे. २०२४ च्या निकालानंतर सर्वांचं लक्ष नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्यावर केंद्रीत आहे.
चंद्राबाबू नायडू हे पहिल्यांदाच किंगमेकर झालेत असं नाही. अभिनेता ते नेता बनलेल्या नायडू यांनी याआधीही अनेक सरकारच्या स्थापनेत नायकाची भूमिका निभावली आहे. इतकेच नाही तर तेलुगु देशम पार्टीची स्थापना करणारे एन. टी रामाराव ज्यांनी १९८० च्या दशकात राजकीय जीवनात पाऊल ठेवले होते. त्यांनीही १९८९ च्या दिल्लीतील सत्ता स्थापनेत महत्त्वाचं योगदान दिले आहे.
२ वर्षात ३ पंतप्रधान
१९९६ मध्ये लोकसभा निवडणुकीत देशातील जनतेनं पी.वी नरसिम्हा राव यांच्या नेतृत्वातील सरकारला नाकारलं मात्र त्यावेळी इतर कुणालाही स्वीकारलं नव्हतं. तेव्हा भाजपा सर्वाधिक १६१ जागा मिळवून मोठा पक्ष बनला होता. मात्र तो बहुमतापासून बराच लांब होता. तरीही मोठा पक्ष म्हणून तत्कालीन राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा यांच्या निमंत्रणावर अटलबिहारी वाजपेयी यांनी सरकार स्थापनेचा दावा करत पंतप्रधानपदाची शपथ घेतली परंतु अवघ्या १३ दिवसांत हे सरकार कोसळले. वाजपेयी बहुमताचे आकडे न गाठू शकल्याने ते सरकार कोसळले आणि त्यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला.
त्यानंतर वी.पी सिंह, हरिकिशन सिंह सुरजीत आणि चंद्राबाबू नायडू यांनी मिळून संयुक्त मोर्चा स्थापन केला. ज्यात पहिल्या पंतप्रधानासाठी बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बसु यांचे नाव आलं. परंतु काही आपापसातील मतभेदामुळे ते पंतप्रधान बनू शकले नाहीत.
किंगमेकर नायडू!
त्याचवर्षी किंगमेकर म्हणून पुढे आलेले आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि टीडीपी नेते चंद्राबाबू नायडू यांनी लोकसभेत १६ जागा जिंकल्या होत्या. नायडू यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी देवेगौडा यांचं नाव पंतप्रधानपदासाठी प्रस्तावित करून भारतीय राजकारणात नव्या नांदीला सुरुवात केली. तोपर्यंत दक्षिण भारतातील कुणीही नेते देशाचा पंतप्रधान झालं नव्हतं.
नायडू यांच्या भूमिकेमुळे दक्षिण भारताला पंतप्रधानपद मिळालं. काँग्रेसनेही बाहेरून पाठिंबा दिल्याने देवेगौडा देशाचे पंतप्रधान बनले. परंतु त्यांचे सरकार १ वर्षातच कोसळले. सीताराम केसरी यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं त्यांचा पाठिंबा काढून घेतला. त्यानंतर मुलायम सिंह यादव, एस.आर बोम्मई आणि अन्य नेत्यांनी पंतप्रधानपदासाठी दावेदारी सांगितली. परंतु कुठल्याही एका नावावर सहमती बनली नाही तेव्हा लालू प्रसाद यादव यांनी इंद्रकुमार गुजराल यांचे नाव पुढे आणले. त्यानंतर चंद्राबाबू नायडू यांनी हरिकिशन सिंह सुरजीत यांना एक फोन कॉल केला आणि त्यांनी गुजराल यांच्या नावावर सहमती दर्शवली. त्यामुळे २१ एप्रिल १९९७ रोजी देशात आय.के गुजराल यांच्या रुपाने नवीन पंतप्रधान मिळाले.
दरम्यान, योगायोग म्हणजे चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीला यंदाच्या लोकसभेतही १६ जागा मिळाल्या आहेत. परंतु इतक्या कमी जागा असूनही ते लोकसभेत किंगमेकर म्हणून पुढे आलेत. निकालानंतर नायडू काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष होते. परंतु एनडीएच्या संसदीय दलाच्या बैठकीत त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या नावाला अनुमोदन देत मागील १० वर्षात भारतात फार मोठे बदल पाहायला मिळालेत. अर्थव्यवस्थेत भारत जगातील पाचवी अर्थव्यवस्था बनला आहे. देशाची अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात आहे असं सांगत मोदींच्या नेतृत्वाचं कौतुक करत एनडीएसोबतच राहण्याची भूमिका घेतली.