नवी दिल्ली - आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष राज्याचा दर्जा न देण्याची भूमिका मोदी सरकारने घेतल्याच्या विरोधात नायडू यांनी सोमवारी (11 फेब्रुवारी) दिल्लीमध्ये एकदिवसीय उपोषणाला सुरुवात केली आहे. महात्मा गांधी यांच्या समाधीचं दर्शन घेऊन त्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे.
चंद्राबाबू नायडू यांनी 'आज आपण येथे सगळे केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी गोळा झालो आहोत. आपल्या आंदोलनाच्या एक दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आंध्र प्रदेशातील गुंटूर येथे गेले होते. याची गरजच काय असं मला विचारायचं आहे', असा प्रश्च विचारला आहे. तसेच 'जर तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर त्या कशा पूर्ण करायच्या आम्हाला चांगलंच माहीत आहे. हा आंध्रप्रदेशातील लोकांच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. जेव्हा कधी आमच्या स्वाभिमानावर हल्ला होईल आम्ही सहन करणार नाही. मी सरकारला आणि खासकरुन पंतप्रधानांना चेतावणी देत आहे की एकट्यावर हल्ला करणं थांबवा', असा इशारा चंद्राबाबू नायडू यांनी दिला आहे.
चंद्राबाबू नायडू हे अनेक दिवसांपासून सातत्याने आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी करत आहेत. आंध्र प्रदेशची राजधानी असलेल्या अमरावतीत चंद्राबाबू यांनी तेलगू देसम संसदीय पक्षाची बैठक घेतली होती. त्यावेळी उपोषणाचा निर्णय घेण्यात आला होता. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा दिला नाही याच्या निषेधार्थ गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळी तेलगू देसम पार्टी रालोआतून बाहेर पडली होती.
पंतप्रधान मोदींना 'ना घर, ना मुलगा', पत्नीचं नाव घेत चंद्राबाबूंचा मोदींवर पलटवारआंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जहरी टीका केली होती. आपल्यावर केलेल्या टीकेला प्रतिउत्तर देताना चंद्राबाबू यांनी मोदींना पत्नी जशोदाबेन यांच्यावरुन लक्ष्य केलं होतं. तुम्ही तुमच्या पत्नीला दूर केलं, तुमच्या कुटुंबाबद्दल तुमच्या मनात थोडातरी आदर आहे का ? मी माझ्या कुटुंबाचा सन्मान करतो, माझ्या कुटुंबावर माझं प्रेम आहे, अशा शब्दात चंद्राबाबू यांनी मोदींवर कौटुंबिक वादातून टीका केली होती.