कृष्णा : लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येतील तसतशी प्रचाराची धार तीव्र होत आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी वायएसआर काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी आणि टीआरएसचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावर निशाणा साधत वादग्रस्त विधान केले आहे. जगनमोहन रेड्डी आणि के. चंद्रशेखर राव यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाळीव कुत्रे असल्याचे एन. चंद्राबाबू नायडू यांनी म्हटले आहे.
मचिलीपटनम येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एन. चंद्राबाबू म्हणाले, "जगनमोहन रेड्डी कुत्र्याची बिस्किटे खात आहेत. तिच बिस्किटे आपल्याला वाटत आहेत. जगनमोहन आणि केसीआर मोदींचे पाळीव कुत्रे आहेत, जे एका बिस्किटासाठी आपले गुडघे टेकून बसतील. सावध राहा, जगनमोहन हे बिस्किट तुम्हाला सुद्धा देण्याचा प्रयत्न करतील."
व्हायएसआर काँग्रेस पार्टीला फंड दिल्याचा आरोप एन. चंद्राबाबू नायडू यांनी भाजपा आणि टीआरएसवर केला आहे. मोदी आणि केसीआर यांनी 1000 करोड रुपये खर्च केले आहेत. केसीआर तुम्ही हे पैसे का खर्च केले? तुम्ही आपल्या राज्याचा पैसा आमच्या येथे का खर्च करत आहात. करोडो रुपये खर्च केल्यानंतरही राज्यात तुम्हाला मते मिळणार नाहीत, असे एन. चंद्राबाबू नायडू म्हणाले.
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला जोर धरला आहे. यंदाच्या या निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून अनेक कल्पना लढविण्यास सुरुवात होत आहे. तसेच, सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाल्याने त्यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगात येऊ लागला आहे. येत्या 11 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे.