प्रकासम : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तारखांची घोषणा झाल्यापासून सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. अनेक पक्षांकडून आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. तसेच, सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी तेलंगनाचे मुख्यमंत्री के. चंद्राशेखर राव यांच्यावर टीका केली आहे.
याचबरोबर, राजकीय रणनितीकार आणि संयुक्त जनता दलाचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांच्यावरही एन. चंद्राबाबू नायडू यांनी गंभीर आरोप केले आहेत. प्रशांत किशोर यांनी आंध्र प्रदेशातील लाखो मतदारांची नावे मतदार यादीतून हटवली आहेत, असा आरोप करत त्यांना दरोडेखोर आहेत, असे संबोधले आहे. एन. चंद्राबाबू नायडू म्हणाले, 'बिहारी दरोडेखोर (डाकू) प्रशांत किशोर यांनी आंध्र प्रदेशमधील लाखो मतदार हटविले आहेत. ते सायबर गुन्हा करत आहेत.'
याचबरोबर, याआधीही एन. चंद्राबाबू नायडू यांनी वायएसआर काँग्रेसचे प्रमुख वाय. एस. जगनमोहन रेड्डी, टीआरएस आणि भाजपावर मतदारांची नावे मतदार यादीतून हटवल्याचा आरोप केला होता. एन. चंद्राबाबू नायडू म्हणाले, 'वायएसआर काँग्रेसचे प्रमुख वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी टीआरएस आणि भाजपासोबत मिळून मतदार यादीतून मतदारांची नावे हटवण्याचा प्रयत्न केला होता. मतदारांची नावे मतदार यादीतून हटवण्यासाठी त्यांनी फॉर्म 7 घेतला होता. त्यामुळे फॉर्म 7 घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल करायला हवेत.'