हैदराबाद : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे. राज्यातील गन्नवरम विमानतळावर शुक्रवारी रात्री चंद्राबाबू नायडू यांची तपासणी करण्यात आली. तसेच, त्यांना विमानापर्यंत देण्यात येणाऱ्या व्हीआयपी सुविधेपासून सुद्धा वंचित ठेवण्यात आले. त्यांना सामान्य व्यक्तीप्रमाणे प्रवाशांच्या शटल बसमधून प्रवास करावा लागला.
आंध्र प्रदेश विधानसभेत विरोधीपक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. यामध्ये 24 तास त्यांच्यासोबत 23 सुरक्षा कर्मचारी आणि एस्कॉर्टच्या गाड्या असतात. 2003 मध्ये तिरुपती येथील अलिपिरीमध्ये नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. तेव्हापासून चंद्राबाबू नायडू यांनी झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे.
दरम्यान, काल विमानतळावर चंद्राबाबू नायडू यांची तपासणी केल्याप्रकरणी टीडीपीने नाराजी व्यक्त केली आहे. चंद्राबाबू नायडू यांच्यासोबत अशाप्रकारे व्यवहार करणे चुकीचे आहे. याचा आम्ही निषेध करतो. भाजपा आणि व्हायएसआर काँग्रेस पार्टी सुडाचे राजकारण करत आहे, असा आरोपही टीडीपीने केला आहे.
टीडीपी नेता आणि राज्यातील माजी गृहमंत्री चिन्ना राजप्पा यांनी सांगितले की, 'अधिकाऱ्यांची वागणूक फक्त चंद्राबाबू नायडू यांचा अपमान करण्यासारखी नव्हती तर त्यांनी झेड प्लस सुरक्षा असताना त्यांच्या सुरक्षेतेवर सुद्धा प्रश्नचिन्ह केले. चंद्राबाबू नायडू यांना अशा परिस्थितीचा सामना करणं हे खूपच संतापजनक आहे. केंद्र आणि राज्य सरकारने त्यांच्या सुरक्षिततेबाबत निर्णय घ्यावा.'
चंद्राबाबू नायडू विरोधी पक्षनेते...आंध्र प्रदेशात विधानसभा निवडणुकीत टीडीपीचा दारूण पराभव झाला. त्या पक्षाचे केवळ २३ उमेदवारच विधानसभेवर निवडून आले आहेत.चंद्राबाबू नायडू राज्यातील विधानसभेत विरोधी पक्षनेते आहेत. तेलगू देसम आमदारांच्या बैठकीत त्यांची नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. निवडून आलेले आमदार आणि पक्षाचे तीन खासदारांची बैठक झाली. त्या बैठकीत चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वावर विश्वास प्रकट करण्यात आला. त्यानंतर, चंद्राबाबू नायडू यांनी पक्षाच्या संसदीय मंडळाचा नेता म्हणून खासदार गल्ला जयदेव यांची नेमणूक केली. लोकसभेतील नेता म्हणून के. राजमोहन नायडू, तर राज्यसभेतील नेता म्हणून के. सत्यनारायण चौधरी यांचीही त्यांनी नियुक्ती केली.