हैदराबाद - आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पंतप्रधाननरेंद्र मोदींवर जहरी टीका केली आहे. आपल्यावर केलेल्या टीकेला प्रतिउत्तर देताना चंद्राबाबू यांनी मोदींना पत्नी जशोदाबेन यांच्यावरुन लक्ष्य केलं. तुम्ही तुमच्या पत्नीला दूर केलं, तुमच्या कुटुंबाबद्दल तुमच्या मनात थोडातरी आदर आहे का ? मी माझ्या कुटुंबाचा सन्मान करतो, माझ्या कुटुंबावर माझं प्रेम आहे, अशा शब्दात चंद्राबाबू यांनी मोदींवर कौटुंबिक वादातून टीका केली आहे.
लोकसभा निवडणूक 2019चे मिशन डोळ्यांसमोर ठेवून पंतप्रधाननरेंद्र मोदी वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन जनसभांना संबोधित करत आहेत. मोदींनी आज आंध्र प्रदेशमध्ये जाऊन चंद्राबाबू नायडूंवर जोरदार हल्लाबोल केला. त्यामुळे दक्षिणेकडील राजकीय वातावरण तापले आहे. यावेळी चंद्राबाबूंनी सासऱ्याच्या पाठीत खंजीर खुपल्याची टीका मोदींनी केली. चंद्राबाबूंनी स्वतःच्या सासऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. ते उद्या दिल्लीत फोटो काढण्यासाठी जात आहे. परंतु भाजपा आपल्या कार्यकर्त्यांच्या पैशानं कार्यक्रम करते, तर हे आंध्रच्या जनतेच्या तिजोरीतून पैसे काढून कार्यक्रम करत आहेत, असेही मोदींनी म्हटले होते. गुंटूरमधल्या जनसभेला संबोधित करताना मोदींनी ही टीका केली. मोदींच्या या टीकेला चंद्राबाबूंनी कौटुंबिक कलहाचे उत्तर दिले.
पंतप्रधान मोदींना ना घर ना मुलगा, त्यांनी सभेत माझ्या मुलाचा संदर्भ मी दिला. मी तुमच्या पत्नीबद्दल प्रश्न विचारतो. लोकांनो सांगा, मोदींना पत्नी आहे हे तुम्हाला माहितीयं का, त्यांच नाव जशोदाबेन आहे, असे म्हणत नायडू यांनी विजयवाडा येथील सभेत मोदींवर टीला केली. दरम्यान, मोदींनी आंध्र सरकार राज्यातील प्रगतीबाबत केलेल्या टीकेलाही चंद्राबाबू यांनी उत्तर दिले.
दरम्यान, 2014 ला आमचं सरकार आलं तेव्हा आम्ही आंध्र प्रदेशसाठी विशेष पॅकेज दिलं. 2016मध्ये ते पॅकेज लागूही करण्यात आलं. त्यामुळे आंध्र प्रदेशला विशेष राज्यासारखीच मदत मिळाली. आंध्राच्या मुख्यमंत्र्यांनी या गोष्ट स्वीकारून केंद्राचे आभार मानले होते. परंतु केंद्रानं दिलेल्या पॅकेजचा आंध्र सरकारनं योग्य वापर केला नाही. राज्याचा विकास करण्यात अपयशी ठरलेल्या टीडीपीनं नंतर यू-टर्न घेतला, असा हल्लाबोलही मोदींनी केला होता.