लखनौ - लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीत नरेंद्र मोदी आणि भाजपाला पुन्हा सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी कंबर कसली आहे. निकालांनंतर विरोधी पक्षांची एकजूट करून सरकार स्थापन करण्यासाठी त्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून, त्यासाठी आज चंद्राबाबू नायडू यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यानंतर बसपाप्रमुख मायावती आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचीही भेट घेतली. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. दरम्यान, 23 मे रोजी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा सत्तेवर येण्यापासून रोखण्यासाठी विरोधकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपाचे बहुमत हुकल्यास मोदींना सत्ता हस्तगत करता येऊ नये, यासाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पुढाकार घेत विरोधी पक्षांच्या नेत्यांची एकजूट करण्यास सुरुवात केली आहे. त्याचा एक भाग म्हणून चंद्राबाबू नायडू यांनी आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. लोकसभेत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला तरी सर्व विरोधी पक्षांना एकत्र करून कर्नाटकप्रमाणे सरकार स्थापन करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे.
चंद्राबाबूंच्या भेटीगाठी जोरात, लखनौमध्ये केली अखिलेश, मायावतींशी चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 7:38 PM