नवी दिल्ली- आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याकडे सध्या असलेल्या संपत्तीची एकुण किंमत 177 कोटी रूपये इतकी आहे. देशातील २९ राज्यांचे मुख्यमंत्री आणि दोन केंद्राशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री यांनी निवडणुकीत दिलेल्या प्रतिज्ञापत्राचा अभ्यास करुन असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने अहवाल प्रसिद्ध केला आहे. या रिपोर्टनुसार, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख एन चंद्राबाबू नायडू यांनी 177 कोटी रूपयांपेक्षा जास्त संपत्तीमुळे सगळ्यात श्रीमंत मुख्यमंत्र्यांच्या यादीत प्रमुख स्थान मिळवलं आहे. तर दुसरीकडे सर्वात कमी संपत्ती त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार यांच्या नावे आहे. माणिक सरकार यांच्या नावे 26 लाख रूपयांची संपत्ती असून सर्वात गरीब मुख्यमंत्री असल्याचं या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
चंद्राबाबू नायडू यांच्याकडे 134.8 कोटी रूपयांची चल संपत्ती आहे तर 42.68 कोटी रूपयांची अचल संपत्ती आहे. या रिपोर्टमध्ये नायडू यांच्यानंतर अरूणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री प्रेमा खांडू यांचं नाव आहे. प्रेमा खांडू यांच्याकडे एकुण 129.57 कोटी रूपयांची संपत्ती आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह तिसऱ्या स्थानी असून त्यांच्याकडे 48.31 कोटी रूपयांची संपत्ती आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव 15.15 कोटी रूपये आणि मेघालयचे मुख्यमंत्री मुकुल संगमा 14.50 कोटी रूपयांच्या संपत्तीसह अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत.
यामध्ये सगळ्यात आश्चर्याची बाब म्हणजे टॉप दहा श्रीमंत मुख्यमंत्र्यांच्या यादीत भाजपाच्या एकाही मुख्यमंत्र्यांनी जागा बनविली नाही. टॉप दहामधील श्रीमंत मुख्यमंत्र्यांच्या यादीत सहा काँग्रेस व उर्वरीत टीडीपी, बीजेडी आणि एसडीएफचे मुख्यमंत्री आहेत. भारतात 31 मुख्यमंत्र्यांपेकी 25 मुख्यमंत्री करोडपती आहेत. माणिक सरकारच्या 24.63 लाख रूपयांची संपत्ती आहे. यामागे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी असून त्यांच्याकडे 30.45 लाख रूपयांची संपत्ती आहे.
जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती 55.96 लाख संपत्तीबरोबर तिसऱ्या सर्वात गरीब मुख्यमंत्री आहेत. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर 61.29 लाख रूपये, झारखंडचे मुख्यमंत्री रघूबर दास 72.72 लाख रूपये संपत्तीसह यादीमध्ये अनुक्रमे चौथ्या व पाचव्या क्रमांकावर आहेत.