अमरावती : आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलुगु देसम पार्टीचे अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. राज्यातील सत्ताधारी वायएसआर काँग्रेस पार्टीने एन. चंद्राबाबू नायडू यांच्याकडे सरकारी निवासस्थान खाली करण्याची मागणी केली आहे. वायएसआर काँग्रेसचे आमदार अल्ला रामकृष्णा रेड्डी यांनी सांगितले की, 'एन. चंद्राबाबू नायडू यांनी अवैध घरात राहत असल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे. तसेच, कोणताही वादविवाद न करता सरकारी निवास्थान खाली केले पाहिजे.'
अल्ला रामकृष्णा रेड्डी हे मंगलागिरी मतदारसंघाचे आमदार आहेत. अल्ला रामकृष्णा रेड्डी म्हणाले,'तेलुगु देसम पार्टीचे अध्यक्ष निवास्थान खाली करणार नसतील, तर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आंध्र प्रदेश शहर विकास प्राधिकरणाकडे तक्रार करणार आहे.' एन. चंद्राबाबू नायडू यांनी 6 मार्च, 2016 रोजी विधानसभेत सांगितले होते की, निवास्थान सरकारी आहे. त्यामुळे एन. चंद्राबाबू नायडू निवास्थान खाली करण्यास बांधील आहेत, असेही अल्ला रामकृष्णा रेड्डी यांनी सांगितले.
गेल्या महिन्यात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या आदेशानुसार चंद्राबाबू नायडू यांचा अमरावती येथील 'प्रजा वेदिका' नावाचा बंगला जमीनदोस्त करण्यात आला होता. प्रजा वेदिका हा अवैधरित्या बांधलेला बंगला आहे. कृष्णा नदीकाठी त्याचे विनापरवाना निर्माण करण्यात आले आहे. यामुळे नदी संवर्धन कायद्याचे उल्लंघन होत आहे. तेलुगु देसम पार्टीच्या मागील कार्यकाळात एन. चंद्राबाबू नायडू यांच्या निवासस्थानासमोर प्रजा वेदिकाचे निर्माण करण्यात आले होते, अशी माहिती मिळते.
दरम्यान, आंध्र प्रदेशमध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत तेलुगु देसम पार्टीचा दारुण पराभव झाला होता. १७५ जागांच्या विधानसभा निवडणुकीत जगनमोहन यांच्या वायएसआर काँग्रेसने १५१ जागांवर विजय मिळवत सत्ता स्थापन केली.
(सत्ता पलटली अन् चंद्राबाबूंची सुरक्षा घटली, विमानतळावर चौकशी!)