नवी दिल्ली - आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पक्षाचे प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू यांच्या ताफ्यावर वायएसआर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला. खबरदारी म्हणून नायडू यांना पोलिसांनी ताब्यत घेतले आहे. नायडू यांना गुरुवारी विमानतळावरून पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना व्हीआयपी कक्षात ठेवण्यात आले.
विमानतळावर नायडू यांच्या ताफ्याला रोखण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या वायएसआर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना हटविण्यासाठी टीडीपीचे कार्यकर्ते दाखल झाले होते. त्यामुळे तिथे तनाव निर्माण झाला होता. यावेळी 'नायडू परत जा' अशा घोषणा देण्यात आल्या. तर टीडीपीचे कार्यकर्ते वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांच्याविरुद्ध नारेबाजी करत होते.
विशाखपट्टनम राज्याला विषेश राजधानीचा दर्जा देण्यास नायडू विरोध करत असून त्यांना विरोध करण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे वायएसआर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी म्हणणे आहे. यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी नायडू यांच्या गाडीवर अंडी, टमाटे आणि चप्पल फेकल्या. तसेच कोलकाता -चेन्नई या राष्ट्रीय महामार्गावर देखील नायडू यांना रोखण्यासाठी चक्काजाम करण्यात आला.
दरम्यान सीआरपीसीच्या कलम 151 नुसार खबरदारीचा उपाय म्हणून नायडू यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना विमानतळाच्या व्हीआयपी कक्षात पाठवण्यात आल्याचे विशाखापट्टनमचे पोलिस आयुक्त राजीव कुमार मीना यांनी माध्यमांना सांगितले.