अमरावती / विजयवाडा : तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) प्रमुख नारा चंद्राबाबू नायडू (वय ७४) यांनी बुधवारी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची चौथ्यांदा शपथ घेतली. आंध्र प्रदेशचे राज्यपाल एस. अब्दुल नजीर यांनी नायडू यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदीसह केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) नेते, केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक मंत्री तसेच चित्रपट आणि इतर अनेक क्षेत्रातील गणमान्य व्यक्ती उपस्थित होते. पवन कल्याण, चंद्राबाबू नायडू यांचे चिरंजीव व टीडीपीचे सरचिटणीस नारा लोकेश यांनी यावेळी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.
पंतप्रधान आंध्रला विशेष दर्जा देणार का : काँग्रेसआंध्र प्रदेशात नवनिर्वाचित एनडीए सरकार शपथविधी घेत असताना, काँग्रेसने पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधत पंतप्रधान आंध्र प्रदेशला विशेष श्रेणीचा दर्जा देणार का, असा सवाल केला. जयराम रमेश यांनी पंतप्रधानांना विचारले की, ‘२०१४ मध्ये राज्याच्या तिरुपती या पवित्र शहरात दिलेल्या वचनानुसार, पंतप्रधान आंध्र प्रदेशला विशेष श्रेणीचा दर्जा देतील का? तसेच राज्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या पोलावरम बहुद्देशीय सिंचन प्रकल्पासाठी प्रलंबित निधी ते जारी करतील का?