नवी दिल्ली - केंद्र सरकारमधून बाहेर पडल्यानंतर चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पक्षाने आता भाजपचं नेतृत्त्व असलेल्या एनडीएलाही रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं भाजपाला हा मोठा धक्का मानला जात आहे. 2019 मध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वीच मित्रपक्षाने काढता पाय घेतला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात विभाजित आंध्र प्रदेशला विशेष दर्जा न दिल्याने वा राज्यासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात न आल्याने चंद्रबाबू नायडू यांनी भाजला रालोआमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला होता. त्यासाठी त्यांनी पक्षाच्या नेत्यांची रविवारी बैठक बोलावली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
त्यात भर म्हणून वायएसआर काँग्रेसकडून आज, शुक्रवारी सरकारविरुद्ध मांडल्या जाणाऱ्या अविश्वास ठरावालाही पाठिंबा देण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी तेलगू देसमचे नेते आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज, शुक्रवारी पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक बोलविली आहे.
आंध्र प्रदेशला खास दर्जा न दिल्यामुळं नाराज होऊन तेलगू देसमचे नेत्यांनी मंत्रीपदाचे राजीनामे दिले होते. आज त्यांनी एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून तूर्त बाहेर न पडण्याचा निर्णय आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसमने घेतल्याने, भाजपा नेत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. पण आज चंद्राबाबूंनी भाजपाला धक्का दिल्याचे वृत्त आहे.
टीडीपीचे सर्वेसर्वा आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक बोलावली होती. त्यात केंद्र सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्वसंमतीने हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं. दरम्यान, नायडू हे नव्या आघाडीसाठी बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती आणि समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांच्याशी चर्चा करू शकतात, असेही या सूत्रांचे म्हणणे आहे.