हैदराबाद- आंध्र प्रदेशातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर कोंग्रेसने चांगलीच मुसंडी मारली आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये चंद्राबाबू नायडू यांच्या टीडिपी पक्षाला धूळ चारत मोठी आघाडी घेतली. त्यामुळे आंध्र प्रदेशमध्ये वायएसआर कॉंग्रेस सत्ता स्थापन करणार असल्याच दिसून येत आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी राजीनामा देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर कॉंग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचे दिसून येते. वायएसआर कॉंग्रेसचे नेते जगनमोहन रेड्डी यांनी हा विजय जनता आणि देवाच्या कृपाशीर्वादानेच मिळाल्याचे म्हटले. सध्याच्या आकडेवारीनुसार वायएसआर रेड्डीच्या कॉंग्रेस पक्षाला सर्वच 150 पेक्षा अधिक जागांवर आघाडी मिळत असल्याचे दिसून येते. तर, चंद्राबाबू यांना सत्ता सोडावी लागणार आहे. टीडिपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी पराभवाबद्दल निवडणूक आयोगाला दोषी ठरवले असून आजचा दिवस लोकशाहीसाठी काळा दिवस असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, आंध्र प्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकांसह विधानसभेच्याही निवडणुका घेण्यात आल्या होत्या. मात्र, चंद्राबाबू नायडू यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले असून आजच फॅक्सद्वारे ते आपला राजीनामा राज्यपाल यांच्याकडे पाठवणार आहेत. त्यानंतर, शुक्रवारी सकाळी 11 वाजता राज्यपाल ईएसएल नरसिंहन यांना भेटतील.
आंध्र प्रदेशमधील कडपा जिल्ह्यातील पुळिवेंदुला विधानसभा मतदारसंघातून वायएसआर कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांनी निवडणूक लढवली होती. या मतदारसंघातून जगन यांनी तब्बल 70400 मतांनी विजय मिळवला आहे. तर, 175 विधानसभा मतदारसंघापैकी 126 पेक्षा जास्त जागांवर वायएसआर कॉंग्रेसने आघाडी घेतली आहे.त्यामुळे सत्तास्थापन करून जगनमोहन रेड्डी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, असेच चित्र दिसत आहे.