भाजपेतर सरकारसाठी चंद्राबाबूंच्या भेटीगाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 05:53 AM2019-05-20T05:53:55+5:302019-05-20T05:54:16+5:30
राहुल गांधी व शरद पवारांशी पुन्हा गुफ्तगू
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत कोणालाच स्पष्ट बहुमत न मिळाल्यास भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापनेची रणनीती आखण्याच्या दृष्टीने तेलुगू देसमचे नेते व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी रविवारी लागोपाठ दुसऱ्या दिवशी समविचारी पक्षनेत्यांच्या भेटीगाठी सुरूच ठेवल्या.
शुक्रवारी दिल्लीत आलेल्या चंद्राबाबूंनी शनिवारनंतर पुन्हा रविवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणे लक्षणीय होते. दोन्ही बाजूंकडून भेटीचा तपशील दिला गेला नसला तरी विरोधकांच्या आघाडीत उघडपणे येण्याची भूमिका अद्याप तरी न घेतलेल्या सपा व बसपाच्या नेत्यांना लखनौमध्ये भेटून आल्यानंतर चंद्राबाबूंनी गांधी व पवार यांना पुन्हा भेटावे हे महत्त्वाचे मानले जात आहे.
याच अनुषंगाने नायडू रविवारी रात्री ‘संपुआ’च्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनाही भेटणे अपेक्षित होते.
भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी प्रसंगी पंतप्रधानपदाचा आग्रह न धरण्याचे संकेत काँग्रेसकडून दिले गेल्यानंतर विरोधकांची एकत्र मोट बांधण्याच्या हालचालींना वेग आला आहे. शनिवारी दिल्लीत राहुल गांधी व शरद पवार यांच्याखेरीज नायडू भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सुधाकर रेड्डी व डी. राजा यांनाही भेटले होते. त्यानंतर त्यांनी लखनौ येथे जाऊन सपाचे नेते अखिलेश यादव व बसपाच्या प्रमुख मायावती यांच्याशीही चर्चा केली होती.
याआधी नायडू यांनी गेल्या आठवड्यात तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख व प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्याशीही चर्चा केली होती. तेलंगणाचे मुख्यमंत्री व तेलंगणा राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव याच दिशेने स्वतंत्रपणे प्रयत्न करीत आहेत. त्यांनाही सोबत घेण्यास आपल्याला वावडे नाही, असे नायडू यांचे म्हणणे आहे.
सोनिया गांधींनी बोलावली बैठक
अर्थात या भेटीगाठींचे खरे फलित २३ मे रोजी निकाल लागल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. कोणाला किती जागा मिळतात, यावर कोण, कोणासोबत जायला तयार होईल, हे ठरेल. याच विचाराने सोनिया गांधी यांनी निकालाच्या दिवशीच २१ विरोधी पक्षांच्या नेत्यांना बैठकीसाठी निमंत्रित केले आहे, तर सर्वांनी त्याआधी २१ तारखेलाच भेटावे, असा नायडू यांचा प्रयत्न आहे.