नवी दिल्ली - नोकरी शोधता शोधता जर कोणी खासदार झालं असं सांगितलं तर सुरुवातीला विश्वासच बसणार नाही. ही गोष्ट गंमत वाटेल पण हो हे खरं आहे. ओडिशातील क्योंझरमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. बीजू जनता दलाच्या खासदार चंद्राणी मुर्मू यांच्याबाबत असंच काही घडलं आहे. लोकसभा निवडणुकाच्या काही दिवस आधी चंद्राणी नोकरी शोधत होत्या. मात्र त्यांना नोकरी मिळाली नाही. बीजेडीने त्यांना तिकीट दिलं आणि नशीबचं बदललं. चंद्राणी या भरघोस मतांनी निवडून आल्या. इतकेच नाही तर देशातील सर्वात तरुण खासदार होण्याचा मानही त्यांना मिळाला आहे.
चंद्राणी यांचं वय 25 वर्ष 11 महिने पूर्ण आहे. तसेच त्यांनी इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले आहे. चंद्राणी यांनी कधीच खासदार होण्याचा विचार केला नव्हता. त्या शिक्षणानंतर नोकरीच्या शोधात होत्या. मात्र क्योंझरमधील लोकसभेची जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव होती. बीजेडीने त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली. या मतदारसंघातून चंद्राणी विजयी झाल्या आहेत. त्यांनी भाजपाच्या अनंत नायक यांचा 67 हजाराहून अधिक मतांनी पराभव केला आहे. नायक हे या मतदारसंघातून दोनदा विजयी झाले होते.
चंद्राणी मुर्मू यांच्याआधी हरियाणाधील हिसार मतदारसंघातून दुष्यंत चौटाला हे सर्वात तरुण खासदार होते. ज्येष्ठ आणि प्रसिद्ध नेते ओम प्रकाश चौटाला यांचे ते नातू आहेत. चंद्राणी मुर्मू यांनी 'शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी नोकरीच्या शोधात होते. मी राजकारणात खासदार म्हणून प्रवेश करेन असा साधा विचारही कधी केला नव्हता. माझी उमेदवारीही अनपेक्षित होती' असं म्हटलं आहे. चंद्राणी यांनी संधी दिल्याबद्दल क्योंझरच्या जनतेचे आणि बीजेडी प्रमुख नवीन पटनायक यांचे आभार मानले आहेत.
'ओडिशा का मोदी'... भाजपाच्या 'या' खासदाराची सोशल मीडियावर लाट
लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपा आणि एनडीएने दणदणीत विजय मिळवला आहे. तर काँग्रेस आणि यूपीएला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारतातील मतदारांनी देशाची सत्ता पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हाती सोपविण्याचा ऐतिहासिक कौल दिला. मोदींच्या झंझावातात, काँग्रेसचे अनेक दिग्गज नेत्यांना पराभव पत्करावा लागल्याने सर्वत्र मोदींची चर्चा आहे. मात्र सोशल मीडियावर 'ओडिशा का मोदी' असं म्हणत भाजपाच्या एका खासदाराची चर्चा रंगली आहे. प्रताप चंद्र सारंग असं या खासदाराचं नाव आहे. ओडिशातील बालासोर येथून सारंग विजयी झाले आहेत. तेथील जनता सारंग यांना 'ओडिशा का मोदी' असं म्हणून संबोधते. सध्या सोशल मीडियावर प्रताप चंद्र सारंग यांच्याच नावाची जोरदार चर्चा आहे. सुलगना डॅश नावाच्या एका ट्वीटर युजरने प्रताप चंद्र सारंग यांचे काही फोटो पोस्ट करून त्यांच्याबाबत माहिती दिली आहे. 24 मे रोजी सुलगनाने केलेल्या ट्वीटला 7700 हून अधिक लोकांनी लाईक केले आहे. तर 3600 लोकांनी ते रिट्वीट केलं आहे.