हैदराबाद - देशातील आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र, मोदींच्या नेतृत्त्वातील भाजपला यंदाही यश मिळेल असा सर्व्हे काही माध्यमांच्या ओपिनियन पोलमध्ये दिसून आला. तर, भाजपला रोखण्यासाठी विरोधकांनी एकत्रित येण्याची हाक दिली आहे. त्यानुसार, २६ विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया नावाने आघाडी स्थापन केली आहे. दुसरीकडे भाजपच्या नेतृत्त्वाखालील एनडीएमध्ये ३८ पक्षांनी सहभाग घेतला आहे. त्यामुळे, यंदाच्या निवडणुकीत रंगत येणार असल्याचे दिसून येते. आता, भारतीय राष्ट्र समितीच्या प्रमुखांना यासंदर्भात प्रश्न विचारला असता, त्यांनी भूमिका स्पष्ट केली.
चंद्रशेखर राव यांनी तेलंगणा राष्ट्र समिती या पक्षाचा विस्तार देशपातळीवर केला असून आपल्या पक्षाचे नावही त्यांनी बदलले आहे. भारतीय राष्ट्र समिती नावाने त्यांनी आपला पक्ष देशभरात पोहोचवण्याची मोहिम हाती घेतली असून नकुतेच महाराष्ट्रातही त्यांची मोठी सभा झाली. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पंढरपुरात सभा घेतली. यावेळी, माजी आमदार भारत भालके यांचे सुपुत्र भगिरथ भालके यांनी त्यांच्या पक्षात प्रवेश केला. त्यावेळी, भाषण करताना राव यांनी आपण कुठल्याही पक्षाची ना ए टीम आहोत, ना बी टीम आहोत. आपण, केवळ शेतकऱ्यांची टीम असल्याचं म्हटलं होतं. आता, देशातील दोन आघाड्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, त्यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली.
तुम्ही कोणत्या आघाडीत आहात, इंडिया की, एनडीए? असा प्रश्न बीआरएस प्रमुख चंद्रशेखर राव यांना विचारण्यात आला होता. त्यावर, बोलताना राव यांनी आपण कुठल्याही आघाडीत नाही, आपण स्वंतत्र पक्ष आहोत, असे स्पष्ट केले. तसेच, आपल्यासोबतही अनेक मित्रपक्ष असल्याचं त्यांनी म्हटलं. तर, नवीन भारत घडवणार बोलणाऱ्या इंडिया आघाडीवरही टीका केली. नवा भारत काय आहे? ज्यांच्याहाती गेल्या ५० वर्षांपासून भारत होता. तेव्हा काहीही बदललं नाही, असे म्हणत इंडिया आघाडीवर राव यांनी टीका केली.
दरम्यान, भाजपने मोदींच्या नेतृत्त्वात पुन्हा एकदा देशात सत्ता स्थापन करण्याचा चंग बांधला आहे. त्यासाठी, मोदी@9 अभियानही सुरू करण्यात आलं असून गेल्या ९ वर्षात मोदींच्या कार्यकाळात घेण्यात आलेल्या जनकल्याणकारी निर्णयांची माहिती, योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे. त्याद्वारे पुन्हा एकदा मोदींनाच पंतप्रधानपदी बसवण्याचं स्वप्न भाजपने बाळगलं असून त्यासाठी प्रयत्न करत आहेत.