तेलंगणामध्ये गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाचा अनपेक्षित आणि धक्कादायक पराभव झाला होता. तेव्हापासून त्यांच्या पक्षाला मोठ्या प्रमाणावर गळती लागली असून, अनेक नेते आणि लोकप्रतिनिधी पक्ष सोडत आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बीआरएसला राज्यात एकही जागा जिंकता आली नव्हती. त्यानंतर आता राज्यातील सत्ताधारी असलेल्या काँग्रेसने बीआरएसला खिंडार पाडण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, बीआरएसच्या सहा विधान परिषदेतील आमदारांनी नुकताच पक्ष सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
बीआरएसच्या या सहा आमदारांना गुरुवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या आमदारांना काँग्रेसचं सदस्यत्व बहाल केलं. के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएसला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये आलेल्या सहा आमदारांमध्ये दांडे विठ्ठल, भानू प्रसाद राव, एम. एस. प्रभाकर, बोग्गरापू दयानंद, येग्गे मल्लेशम आणि बसवराजू सरैया यांचा समावेश आहे.
काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी बीआरएसचे आमदार मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या निवासस्थानी आले तेव्हा काँग्रेसच्या तेलंगणाच्या प्रभारी दीपा दासमुंशी आणि इतर नेते उपस्थित होते. दरम्यान, मागच्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर बीआरएसचे सहा आमदार काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. तसेच आणखी काही आमदार सत्ताधारी पक्षात दाखल होऊ शकतात.
दोन दिवसांपूर्वीही बीआरएसला मोठा धक्का बसला होता. तेव्हा बीआरएसचे दिग्गज नेते आणि राज्यसभा खासदार के. केशव राव काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. नवी दिल्लीमध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी तसेच रेवंत रेड्डी यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.