तमाम भारतीयांसाठी आजचा दिवस अभिमानाचा, सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असाच आहे. दुपारी बरोब्बर २.४३ वाजता 'बाहुबली' नावाचं रॉकेट यानाला घेऊन अवकाशी झेपावलं आणि पुढच्या काही मिनिटांत त्यानं पृथ्वीच्या कक्षेत यशस्वीपणे प्रवेश केला. त्यानंतर, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष के सिवन यांनी उड्डाण यशस्वी झाल्याची घोषणा केली आणि सगळ्यांचाच ऊर भरून आला. 'चांद्रयान-२'चं यशस्वी उड्डाण हा आपल्या तिरंग्याचा सन्मान आहे, अशा भावना व्यक्त केल्या. आता पुढच्या मोहिमेची तयारी सुरू करणार असल्याचं सिवन यांनी जाहीर केलं, तेव्हा इस्रोबद्दलचा आदर दुणावला.
'भारताने दुसऱ्या चांद्रमोहीमेसाठी घेतलेली झेप ही ऐतिहासिक प्रवासाची सुरुवात आहे. आजवर जे अज्ञात आहे त्याचा शोध घेण्याचा हा प्रवास आहे', असं सिवन म्हणाले. गेला आठवडाभर दिवसरात्र एक करून ही मोहीम यशस्वी करण्यासाठी झटणाऱ्या शास्त्रज्ञांचे त्यांनी मनापासून आभार मानले.
गेल्या रविवारी - १५ जुलैला मध्यरात्री 'चांद्रयान-२' अवकाशी झेपावणार होतं. परंतु, अगदी शेवटच्या क्षणी तांत्रिक कारणामुळे हे उड्डाण स्थगित करावं लागलं होतं. इस्रोच्या शास्रज्ञांनी चिकाटीनं यानातील त्रुटी दुरुस्त केली आणि आज या वैज्ञानिकांच्या अथक परिश्रमांचं चीज झालं. चांद्रयान-२च्या भरारीमुळे इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. आता ६ सप्टेंबरला हे यान चंद्रावर उतरेल.
चांद्रयान-२ चं प्रक्षेपण आणि के सिवन यांचं भाषणः