नवी दिल्ली : अगदी कमी खर्चात उपग्रहांचे प्रक्षेपण करणाऱ्या प्रक्षेपकांच्या निर्मितीनंतर भारतीय संशोधकांनी आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. भारताच्या चांद्रयान-2 मोहीमेचा खर्च हॉलिवूडच्या 'इंटस्टेलर' या चित्रपटापेक्षाही कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे. इंटरस्टेरल या चित्रपटाच्या निर्मितीसाठी 1,062 कोटींचा खर्च आला होता. मात्र, भारताची चांद्रयान-2 मोहीम अवघ्या 978 कोटींमध्ये पार पडत आहे. यापूर्वीची भारताची 2013 मधील मंगळयान मोहीमही कमी खर्चामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय ठरली होती. या मोहिमेसाठी 470 कोटी रूपये खर्च झाला होता. त्यावेळी प्रदर्शित झालेल्या 'ग्रॅव्हिटी' या हॉलिवूडपटाचे बजेटही ( 644 कोटी) या मोहीमेपेक्षा जास्त होते.
भारतीय अंतराळ अवकाश संस्थेने (इस्त्रो) इतक्या कमी खर्चात मोहीम पार पाडल्याबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे खूप कौतुकही झाले होते. याबद्दल खुलासा करताना 'इस्त्रो'चे अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी सांगितले होते की, प्रक्रिया अत्यंत सोपी बनवणे, मोठ्या क्लिष्ट सिस्टीमला लहान आणि साधं बनवणं, क्वालिटी कंट्रोल आणि आऊटपूट वाढवणं यामुळे आपल्या मोहीमा कमी खर्चातही यशस्वी होत आहेत. आम्ही अंतराळयान किंवा रॉकेट विकसित करण्याच्या प्रत्येक टप्प्यावर लक्ष ठेवतो, ज्यामुळे उत्पादनाची नासाडी थांबते आणि खर्च कमी होतो.
सोमवार पहाटे 2.51 वाजता आंध्र प्रदेशच्याक्ष श्रीहरी कोटा येथून इस्रोचे चांद्रयान 2 अवकाशभरारी घेत आहे. या मोहिमेंतर्गत चंद्रावर सॉफ्टलँडिंगद्वारे रोव्हर वॉक होणार आहे. या मिशनसाठी चंद्राच्या दक्षिण गोलार्धावरील जागा निवडण्यात आली आहे. या भागात खूप मोठे आणि लक्षावधी वर्षांपूर्वीचे जुने खडक आहेत. त्यातून आपल्याला चंद्राची अधिक माहिती मिळणार असल्याचे सिवन यांनी सांगितले होते. यापूर्वी नासाचे अपोलो आणि रशियाचे लुना अवकाश यान चांद्रभूमीवर उतरले होते. पण, या मोहिमांमध्ये रोव्हर चंद्रावर मध्यभागी उतरवण्यात आला होता. भारताच्या चांद्रयान 2 मोहिमेचा खर्च 978 कोटी असून या अवकाश यानाचे वजन 3.8 टन एवढे आहे.