नवी दिल्ली : भारताचे दुसरे यान चंद्रावर पाठविण्याच्या भारतीय अंतराळ संशोधन संघटनेच्या (इस्रो) ‘चांद्रयान-२’ मोहिमेचा खर्च फक्त ८०० कोटी रुपये असेल, असे पंतप्रधान कार्यलयातील राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी सांगितले. येत्या एप्रिलमध्ये ‘चांद्रयान-२’ रवाना करण्याची तयारी ‘इस्रो’ करत आहे.‘चांद्रयान-१’ मोहिमही ‘इस्रो’ने एवढ्या कमी खर्चात फत्ते केली होती की, तंत्रशास्त्रीय कामगिरीप्रमाणेच या काटकसरीचीही जगभर वाहवा झाली होती. ‘चांद्रयान-१’ चा खर्च अंतराळ सफरीवर आधारित ‘ग्रॅव्हिटी’ या हॉलीवूड चित्रपटाहूनही कमी होता. आता ‘चांद्रयान-२’चा ८०० कोटी रुपये हा अपेक्षित खर्चही ‘इंटरस्टेलर’ या हॉलीवूडच्या सन २०१४मधील अंतराळपटाच्या खर्चाहून चक्क २६२ कोटी रुपये कमी असणार आहे. ‘इंटरस्टेलर’च्या निर्मितीवर १६५ दशलक्ष डॉलर (१०६५ कोटी रु.) खर्च झाले होते.‘चांद्रयान-१’च्या तुलनेत ‘चांद्रयान-२’ अंतराळ तंत्रज्ञानाच्या दृष्टीने आव्हानात्मक असणार आहे. या वेळी या यानासोबत चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणारे आॅर्बिटर, चंद्रावर उतरमारे ‘लँडर’ व चंद्राच्या पृष्ठभागावर फेरफटका मारणारे ‘रोव्हर’ही पाठविण्यात येणार आहे.
‘चांद्रयान-२’चा खर्च चित्रपटाहूनही कमी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 2:52 AM