130 कोटी देशवासीयांसह संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या इस्रोचेचांद्रयान-2 दुपारी 2.43 मिनिटांनी चंद्राच्या दिशेने झेपावले. गेल्या रविवारी मध्यरात्री नियोजित असलेले चांद्रयान-2 चे प्रक्षेपण तांत्रिक कारणामुळे स्थगित करण्यात आल्याने इस्रोच्या शास्रज्ञांसह देशवासीयांच्या मनात चिंतेचे वातावरण पसरले होते. मात्र, आज हे यान नियोजित कार्यक्रमाप्रमाणे चंद्राच्या दिशेने यशस्वीरीत्या झेपावले आहे. चांद्रयान 2 झेपावताच काही वेळानंतर इस्रोतील शास्त्रज्ञांनी एकमेकांचे हस्तांदोलन करुन आणि टाळ्या वाजवून आनंद साजरा केला.
‘चांद्रयान-2’ मोहिमेवर जाणा-या ‘जीएसएलव्ही-मार्क-3’ या शक्तिशाली रॉकेटचे आज दुपारी 2.43 वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून प्रक्षेपण झाले. ‘चांद्रयान-2’ ला चंद्राच्या दक्षिण ध्रुवार्यंत पोहोचण्यास 48 दिवसांचा कालावधी लागणार आहे. इस्रोच्या या कामिगिरीचा देशाला अभिमान आहे. इस्रोच्या या यानाचे एकूण वजन 2389 किलो एवढे असून चंद्रावर उतरणारा भाग लँडर हा 1471 किलो वजनाचा आहे. या भागास अंतराळ कामाचे जनक विक्रम साराभाई यांचे नाव दिले आहे. चंद्रावर फिरुन तेथील पृष्ठभागाचं निरीक्षण करण्यासाठीचा विक्रम भाग म्हणजे ब्रीफकेसच्या आकाराची 27 किलो वजनाची सहाचाकी बोग्गी (रोव्हर) आहे. चंद्रावर फेरफटका मारणाऱ्या या बग्गीवर तिरंगा आणि अशोकचक्र आहे. या बग्गीवर थ्रीडी कॅमेरा, स्पेक्ट्रोस्कोप, स्पेक्ट्रोमिटर्स यांसारख्या यंत्रणा आहेत. या बग्गीस प्रग्यान असे नाव देण्यात आलं आहे.
चांद्रयानावरचा विक्रम भाग चंद्राच्या दक्षिण ध्रुवापासून 600 किमी अंतराच्या दोन विवरांच्या मधील प्रदेशात उतरणार आहे. तर, यानाच्या पोटातील प्रग्यान नावाची बग्गीही यानंतरच चंद्रावर उतरली जाणार आहे. या बग्गीद्वारे चंद्रावरील माती (रेगोलिथ) आणि इतर मुलद्रव्यांचं निरीक्षण केल जाईल. तसेच, आजुबाजूच्या हवामानाचं विश्लेषणही ही बग्गी करेल. या बग्गीकडून करण्यात आलेली सर्व निरीक्षण पृथ्वीकडे पाठवली जातील. चंद्राच्या दक्षिण ध्रुवामधील विवरांमध्ये सूर्यप्रकाश कमी प्रमाणात आहे, त्यामुळे तिथं पाणी असू शकतं. त्यामुळे चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरविण्यात येत आहे. तसेच, चंद्राच्या जन्मापासूनची मूलद्रव्य आणि इतर घटक पदार्थही तिथे सापडली जाऊ शकतात. या भागाचा अभ्यास म्हणजे चंद्राचा आणि सौरमालेतील इतर ग्रहगोलांचा अभ्यास असल्याचे शास्त्रज्ञ मानतात. त्यामुळे, चंद्राच्या दक्षिण ध्रुवानजीक चांद्रयान उतरवून तेथील निरीक्षण नोंदविण्याचा प्रयत्न भारताकडून होत आहे. जगातील कुठल्याही देशाने अद्याप अशी कामगिरी केली नसल्याने भारतासाठी ही अभिमानास्पद बाब आहे. त्यासाठी, इस्रोच्या शास्त्रज्ञांचं कौतुक कराव तेवढं कमीच.