नवी दिल्ली: लँडर विक्रमचं स्थान समजलं असल्याची माहिती इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी दिली. चंद्राभोवती फिरणाऱ्या ऑर्बिटरनं विक्रमचा फोटो पाठवला आहे. मात्र अद्याप विक्रमशी संपर्क झालेला नाही, असं सिवन यांनी सांगितलं. चांद्रयान 2 ऑर्बिटरनं लँडर विक्रमचा फोटो पाठवला आहे. त्यामुळे लँडरचं स्थान समजलं आहे. आता विक्रमशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असं सिवन म्हणाले. चंद्राची परिक्रमा करणाऱ्या ऑर्बिटरनं विक्रमची थर्मल इमेज पाठवली आहे. त्यामुळे विक्रमच्या स्थानाची माहिती समजू शकली आहे, असं सिवन यांनी 'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं. इस्रोला अद्याप विक्रमशी संपर्क साधता आलेला नाही. त्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती सिवन यांनी दिली. पुढील 14 दिवस विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जाईल आणि ऑर्बिटरकडून मिळणारी माहिती अतिशय महत्त्वाची असेल, असं इस्रोकडून सांगण्यात आलं आहे. चंद्रावर उतरण्यासाठी केवळ दोन किलोमीटरचं अंतर शिल्लक असताना विक्रम लँडरचा संपर्क तुटला. विक्रम लँडरचे चंद्रापासून 2.1 किलोमीटर अंतरावर असताना त्याचं काम व्यवस्थित सुरू होतं. त्यानंतर विक्रम लँडरचा इस्रोबत असलेला संपर्क तुटला. सध्या या घटनेचं विश्लेषण इस्त्रोकडून सुरू आहे. चांद्रयान-2 मोहीम जवळपास 95 टक्के यशस्वी झाली आहे. चंद्रयान-2 चा ऑर्बिटर जवळपास 7.5 वर्षापर्यंत काम करु शकतो. तसंच, गगनयानसह इस्रोच्या अन्य अंतराळ मोहिमादेखील वेळेतच पूर्ण होणार असल्याची माहिती इस्रोकडून देण्यात आली आहे.