नवी दिल्ली - भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने पाठवलेले ‘चांद्रयान-2’ मजल दरमजल करत चंद्राच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. ‘चांद्रयान-2’ ने प्रवासाचा महत्त्वाचा टप्पा यशस्वीरित्या पार केला आहे. 7 सप्टेंबर रोजी ‘चांद्रयान-2’ दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. ‘चांद्रयान-2’ कडून देशवासीयांना हा सुखद संदेश देण्यात आला आहे. इस्रोने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतची माहिती दिली आहे. 'नमस्कार, मी ‘चांद्रयान-2’. माझा आतापर्यंतचा प्रवास विलक्षण झाला. 7 सप्टेंबर रोजी मी दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. मी कुठे आहे आणि काय करत आहे हे जाणून घेण्यासाठी माझ्या संपर्कात राहा' असं ट्वीट इस्रोने केलं आहे.
चांद्रयान-2 ने याआधी भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी रात्री 2 वाजून 21 मिनिटांनी यानाने यशस्वीपणे पृथ्वीची कक्षा सोडली आणि चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. इस्रोने ट्रान्स लूनर इंजेक्शन यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. स्पेसक्राफ्टचे लिक्विड इंजिन 1,203 सेकंदासाठी फायर करण्यात आले. यानंतर 22 दिवस पृथ्वीच्या कक्षेत असलेले चांद्रयान-2 चंद्राच्या दिशेने झेपावले आहे. 'इस्रो'चे अध्यक्ष के. सिवन यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'चांद्रयान-2' हे पुढील सहा दिवस चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू ठेवणार आहे. जवळपास 4.1 लाख किलोमीटरचा प्रवास करून ते 20 ऑगस्टला अंतिम कक्षेत पोहोचेल.
22 जुलै रोजी श्रीहरिकोटा येथील अंतराळ तळावरून प्रक्षेपित करण्यात आलेले भारताचे ‘चांद्रयान-2’ येत्या 20 ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत पोहोचेल व ते 7 सप्टेंबर रोजी ठरल्याप्रमाणे चंद्राच्या दक्षिण ध्रुवानजीक उतरेल, असे के. सिवन यांनी सांगितले आहे. भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक मानले जाणाऱ्या डॉ. विक्रम साराभाई यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी डॉ. सिवन आले होते. ‘चांद्रयान-2’चे ‘ऑर्बिटर’, ‘लॅण्डर’ आणि ‘रोव्हर’ हे तिन्ही भाग सुस्थितीत असून सर्व यंत्रणा उत्तम प्रकारे काम करत आहेत, असे त्यांनी सांगितले.
चंद्रावर पोहोचण्यासाठी यानाला 40 दिवसांपेक्षा अधिक कालावधी लागणार आहे. चंद्रावर उतरण्यापूर्वीची 15 मिनिटं यानासाठी सर्वाधिक आव्हानात्मक असणार आहेत. के. सिवन यांनी लँडिंगच्या वेळची शेवटची 15 मिनिटं ही अधिक आव्हानात्मक असणार आहेत असं म्हटलं आहे. तसेच याआधी के. सिवन यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'चंद्रापासून 30 किलोमीटर इतक्या अंतरावर गेल्यानंतर चांद्रयान-2 ची गती कमी करण्यात येणार आहे. विक्रमला चंद्राच्या भूमीवर उतरवणे अतिशय आव्हानात्मक असणार आहे. याच दरम्यानची 15 मिनिटं ही अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत. भारत पहिल्यादाच सॉफ्ट लँडिंग करणार आहे. केवळ इस्रोसाठीच नाही, तर संपूर्ण भारतीयांसाठीच ही 15 मिनिटं आव्हानात्मक असतील.' सॉफ्ट लँडिंग करण्यात भारत यशस्वी झाल्यास असे करणारा तो जगातील चौथा देश ठरणार आहे. आतापर्यंत अमेरिका, रशिया आणि चीन यामध्ये यशस्वी झाला आहे.
पृथ्वी आणि चंद्रादरम्यानचे अंतर हे 3 लाख 84 हजार किलोमीटर आहे. चांद्रयान-2 द्वारे लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान चंद्रापर्यंत जातील. चंद्राच्या भूमीवर उतरण्यापूर्वी 4 दिवसाआधी रोव्हर 'विक्रम' उतरण्याच्या जागेची पाहणी करणे सुरू करेल. त्यानंतर लँडर यानापासून डिबूस्ट होईल. त्यानंतर विक्रम चंद्राच्या भूमीच्या अगदी जवळ पोहोचेल. जिथे उतरायचे आहे त्या जागेचे स्कॅनिंग सुरू होईल. त्यानंतर 6 ते 7 सप्टेंबरदरम्यान लँडिंगची प्रक्रिया सुरू होईल. लँडिंगनंतर लँडर विक्रमचा दरवाजा उघडेल. त्यानंतर रोव्हर प्रज्ञान बाहेर येईल. रोव्हर बाहेर येण्यासाठी सुमारे 4 तास लागतील. त्यानंतर तो वैज्ञानिक परिक्षणांसाठी चंद्राच्या भूमीवर चालू लागेल. 15 मिनिटांच्या आतमध्ये इस्रोला लँडिगचे फोटो मिळणे सुरू होईल.