नवी दिल्ली - चांद्रयान-2 च्या विक्रम मॉड्यूलचे चांद्रभूमीवर सॉफ्ट लँडिंग करण्याचा भारताचा प्रयत्न अयशस्वी झाला असला तरी यातून मिळालेल्या धड्याचा उपयोग भारताला भविष्यातील मोहिमांसाठी होईल असं प्रतिपादन अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था नासाचे माजी अंतराळवीर जेरी लायनेंगर यांनी केले.
जेरी लायनेंगर हे रशियाई अवकाश स्थानक 'मीर' वर पाच महिने होते. 1986 ते 2001 या कालावधीत पृथ्वीच्या निम्न कक्षेत मीर कार्यरत होते. चांद्रयान-2 च्या चंद्रभूमीवरील अवतरणाचे नॅशनल जिओग्राफिक वाहिनीने लाईव्ह प्रक्षेपण केले. त्याताल चर्चेत जेरी लायनेंगर सहभागी झाले होते. लायनेंगर यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, आपण फार निराश होण्याची गरज नाही, खूप खूप अवघड कार्य पार पाडण्याचा भारताचा प्रयत्न होता.
लँडर खाली येत असताना सर्व काही नियोजनाप्रमाणे होतही होते. दुर्दैवाने चांद्रभूमीपासून 400 मीटर अंतरावरील हॉवर पॉईंट वर पोहचण्यापूर्वीच त्याचा संपर्क तुटला. त्या बिंदूवर लँडर पोहोचले असते, तरी ती बाब उपयुक्त ठरली असती. रडार आणि लेसरची तपासणी ही त्यामुळे करता आली असती. जेरी लायनेंगर पुढे म्हणाले की, तुम्ही मागे वळून या संपूर्ण मोहिमेकडे पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल की, ही मोहीम भविष्यातील मोहिमांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. ऑर्बिटर अत्यंत मौल्यवान माहिती पृथ्वीवर पाठवत राहणार आहे. ऑर्बिटरवरील सर्व यंत्रणा सुस्थितीत आहेत. या मोहिमेतून जे धडे मिळाले आहेत. त्याकडे पाहून मी या मोहिमेकडे एक पूर्णत: यशस्वी मोहीम म्हणूनच पाहतो. अत्यंत कठीण असलेली मोहीम हाती घेतल्याबद्दल लायनेंगर यांनी इस्रोचे कौतुक केले आहे.
इस्रोचा विक्रम लँडरशी असलेला संपर्क तुटल्यानं चांद्रयान-2 मोहिमेला धक्का बसला. जवळपास संपूर्ण मोहीम अगदी सुरळीत सुरू असताना अखेरच्या दोन मिनिटांमध्ये इस्रोच्या हाती निराशा आली. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश होण्याची संधी भारतासमोर होती. मात्र या यशानं इस्रोला थोडक्यात हुलकावणी दिली. मात्र यानंतरही इस्रोची महत्त्वाकांक्षी चांद्रयान मोहीम 95 टक्के यशस्वी झाली आहे.