भारतीय चांद्रयान-२ चे विक्रम हे लँडर शनिवारी पहाटे १ वाजून ५५ मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करण्याच्या बेतात असतानाच ऑर्बिटरचा आणि लँडरचा संपर्क तुटला. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह संपूर्ण देशाने रात्रभर जागून अनुभव घेतला. इस्रो लँडर उतरवण्याचे आटोकाट प्रयत्न करीत होते. मात्र, संपर्क तुटल्यामुळे इस्रोतील शास्त्रज्ञांचे चेहरे पडले, अनेकांच्या डोळ्यात पाणी आले, कोट्यवधी भारतीयांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या... त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका वाक्याने देशाला पुन्हा नवी उमेद मिळाली आहे. तर इस्रोतील शास्त्रज्ञांनीही सुटकेचा निश्वास सोडला.
होप फॉर द बेस्ट... पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हे एक वाक्य इस्रोतील वैज्ञानिकांना आणि 130 कोटी भारतीयांना नवी ऊर्जा देणारं ठरलंय. चांद्रयान 2 मोहिमेतील शेवटचा टप्पा असलेल्या विक्रम लँडरशी संपर्क तुटल्यानंतर प्रत्येक भारतीयाची निराशा झाली होती. त्यावेळी, देशाचे प्रमुख पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रोच्या वैज्ञानिकांचे आणि देशवासियांचे मनोधैर्य वाढवले.
चंद्रापासून केवळ 2 किमी अंतर दूर असताना विक्रम लँडरशी इस्रोचा संपर्क तुटला. त्यानंतर, पंतप्रधान नरेद्र मोदींनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचे मनोबल वाढविलं. होप फॉर द बेस्ट... असे म्हणत मोदींनी शास्त्रज्ञांना धीर दिला. मी पाहिलंय, जेव्हा संपर्क तुटला तेव्हा सगळ्यांचे चेहरे पडले होते. पण, तुम्ही जे केलंय ते खूप मोठं काम आहे. तुम्ही देशाची, विज्ञानाची आणि मानवजातीची सेवा केली. मी तुमच्या पाठिशी असून संपूर्ण देश तुमच्यासोबत आहे, असे मोदींनी म्हटले. मोदींचे एक मिनिटांचे ते भाषण देशावासियांना नवी ऊर्जा देऊन गेलंय. त्यानंतर, मोदींनी ट्विट करुनही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
देशाला आपल्या वैज्ञानिकांचा अभिमान आहे, आपलं काम आणि शेवटच्या क्षणापर्यंत आपण या मोहिमेत दिलेलं योगदान गौरवास्पद आहे. हा क्षण अतिशय धाडसाचा आणि धैर्याचा आहे. आपण ते धैर्य ठेऊच, इस्रोचे चेअरमन चांद्रयान 2 मोहिमेबद्दल माहिती देत असून आपण मोहिमेच्या चांगल्या पहाटेची आशा ठेऊया, असे ट्विट मोदींनी केलं आहे.